केंद्र सरकार आमचा बाप आहे, केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा: संजय राऊत

आपल्या राज्यातील जनतेला मदत आणि सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची म्हणून काही जबाबदारी आहे. (sanjay raut)

केंद्र सरकार आमचा बाप आहे, केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा: संजय राऊत
संजय राऊत
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 27, 2021 | 10:24 AM

मुंबई: आपल्या राज्यातील जनतेला मदत आणि सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची म्हणून काही जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतं. विशेषत मुंबई. पण आम्ही तो हिशोब मागायला बसलो नाही. केंद्र आमचा बाप आहे. त्यांच्याकडून मदत झाली तर ती नक्कीच स्विकारली जाईल, असं सांगतानाच केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मंत्री आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचा दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं. आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. (Maharashtra floods: central government should help maharashtra, says sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही टोलेबाजी केली. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. पण केंद्राची स्वत:ची म्हणून जबाबदारी असते. त्यांनी मदत केली पाहिजे. या मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय साधून आहे. मुख्यमंत्री स्वत: केंद्रात बोलत आहेत. काही कमी जास्त झाले तर विरोधी पक्ष आहेत. ते बोलतील. केंद्रात आपले एवढे मंत्री आहेत. तेही बोलतील. ही राजकीय श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्याचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा राजकीय श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही, असं राऊत म्हणाले. तळीये येथील नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधून देणार आहोत. पण केंद्राकडून कोणती योजना येत असेल तर त्याचा राज्य सरकार विचार करेल, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्र्यांना टोला

महाराष्ट्रातील मंत्री काही केंद्रात आहेत. त्यांनी काही घोषणा केल्या आहेत. त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा. नरेंद्र मोदींच्या सहीचा चेक मिळाला तर आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू. कोकण, सातारा, सांगलीच्या लोकांना देऊ. कारण एकएक पै महत्त्वाचा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

राजकीय पर्यटन करू नका

मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते, त्यांच्यासोबत काही लोक होते. तेव्हा त्यांना पदावरून जावं लागलं. अशा घटना घडतात तेव्हा तिथे रेस्क्यू ऑपरेशन करताना डिस्टर्ब होतं. राजकीय नेत्यांनी आपल्यावर नियंत्रण ठेवावं. थोडा संयम ठेवावा. राजकीय पर्यटन करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

ही श्रेयवादाची लढाई नाही

देशात अशा घटना घडतात तेव्हा बचाव कार्य सुरू होतं. तेव्हा कोणतेही अडथळे येऊ नये हा एक नियम आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडतात तेव्हा आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, अधिकाऱ्यांवर आरोप करणं, त्यांच्यावर हल्ले करणं हे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येकजण मनात वेदना घेऊन मदत कार्य करत आहे. तेव्हा आरोप प्रत्यारोप कशाला? महाराष्ट्र आपला आहे. कोकण आपला आहे. सातारा, सांगलीची लोकं आपली आहेत. ही काही श्रेयाची लढाई नाही. चढाई लढाई नाही. जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणूसकी शून्य काम करत आहेत. असं होऊ नये, असं ते म्हणाले.

राष्ट्राला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले. (Maharashtra floods: central government should help maharashtra, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain LIVE | पुणे शहर आणि जिल्ह्यात 489.45 मिमी पाऊस, सर्वाधिक पाऊस मावळ तालुक्यात

राष्ट्रवादीच्या सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना, जनतेनेही फूल ना फुलाची पाकळी द्यावी : अजित पवार

महाड, नागोठणे, पेणमध्ये वीज यंत्रणा कोलमडल्या; ऊर्जामंत्री राऊत मंगळवारी करणार पाहणी

(Maharashtra floods: central government should help maharashtra, says sanjay raut)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें