Maharashtra Unlock | रेस्टॉरंट, दुकानं ते लोकल, राज्यात कोणकोणत्या कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता?

कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर किमान 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे

Maharashtra Unlock | रेस्टॉरंट, दुकानं ते लोकल, राज्यात कोणकोणत्या कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता?
रेस्टॉरंट, विवाह सोहळे, मुंबई लोकलबाबत निर्बंधांमध्ये शिथिलता

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने महाराष्ट्रात आजपासून (15 ऑगस्ट) अनेक नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात येणार आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन किमान 14 दिवस झालेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकल पुन्हा खुली झाली आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानं, विवाह सोहळे यांच्याबाबतही मोठा दिलासादायक निर्णय झाला आहे. मात्र मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीतून लसवंत नागरिकांचीही अद्याप सुटका नाही

कोरोना निर्बंधांमध्ये आजपासून कशात शिथिलता?

>> कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर किमान 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा. कागदपत्रांची पडताळणी केल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास 500 रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.

>> हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

>> विवाह सोहळ्यांबाबतही ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेने परवानगी देण्यात आली आहे.

>> खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

>> सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

>> सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

>> इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना लोकल’स्वातंत्र्य’, लसवंत प्रवाशांसाठी मुंबईची लाईफलाईन पुन्हा खुली

Published On - 9:51 am, Sun, 15 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI