विधान परिषद निवडणुकीत चुरस की विजय सोपा?; कसं आहे मुंबईतील गणित

विधान परिषदेसाठी मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीत चुरस की विजय सोपा?; कसं आहे मुंबईतील गणित
rajhans singh

मुंबई: विधान परिषदेसाठी मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून तिसरा उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार की दोघांचाही विजय सोपा होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या राजकीय गणिताचा घेतलेला हा आढावा.

शिवसेनेकडून शिंदे मैदानात

मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुनील शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. शिवाय बेस्ट समितीचे ते अध्यक्षही होते. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपची निवडणुकीची तयारी, राजहंस लढणार

भाजपने माजी आमदार राजहंस सिंह यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. राजहंस सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते अडगळीत गेले होते. मात्र, भाजपने आता त्यांना उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यास सुरुवात केली आहे. राजहंस सिंह यांच्या उमेदवारीकडे राजकीय अंगानेही पाहिले जात आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जात आहे.

आकडा काय सांगतो?

मुंबई महानगरपालिकेचे 227 निर्वाचित नगरसेवक आणि 5 नामनिर्देशित नगरसेवक असे 232 नगरसेवक आहेत. त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने विद्यमान नगरसेवकांची संख्या 229 एवढी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान 77 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेकडे सध्या 99 नगरसेवक मतदार आहेत. तर भाजपकडे 83 नगरसेवक मतदार आहेत. त्याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य मिळून 47 नगरसेवक मतदार आहेत. त्यामुळे राजहंस सिंह आणि सुनील शिंदे यांचा विजय सोपा मानला जात आहे. त्यात जर काँग्रेसने तिसरा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. तिसरा उमेदवार मैदानात उतरल्यास मतांची फोडाफोडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

 

संबंधित बातम्या:

‘बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच’, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला

महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

शिवसेनेचा महापालिकेत 100 कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा, भाजप आमदार कोटेचा यांची चौकशीची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI