
मुंबईत सध्या महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या 7 दिवसात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम मतदारसंघात मनसेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहे. मनसे नेते संतोष धुरी यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता अंधेरी विधानसभा अध्यक्ष मनीष धुरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहित उघड नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप मनीष धुरी यांनी या पत्रात केला आहे.
अंधेरी पश्चिममधील वॉर्ड क्रमांक ६७ मधून मनसेचे कुशल धुरी हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि अनिल परब यांनी घेतलेल्या जबाबदारीच्या आश्वासनानंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. सध्या सर्वत्र प्रचारसभा सुरु आहेत. मात्र अंधेरीतील प्रभाग क्रमांक ६७ च्या प्रत्यक्ष प्रचारात शिवसेना ठाकरे गटाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे मनीष धुरी यांनी म्हटले आहे.
मनीष धुरी यांनी पत्रात अत्यंत तिखट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनिल परब, संजय कदम आणि दीपक सणस यांनी आमचा केसाने गळा कापला आहे. ते महाविकासाआघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि अधिकृत उमेदवार असलेल्या कुशल धुरी यांचा प्रचार करण्याऐवजी, पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार दीपक सणस यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी असतात. अनिल परब यांनी पूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊनही ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रचारापासून दूर आहेत, असे मनीष धुरी म्हणाले.
वॉर्ड क्र. ६७ मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे लोक अधिकृत उमेदवाराला डावलून अपक्ष उमेदवाराचे काम करत आहेत, मनसेचे सर्व पदाधिकारी इतर उमेदवारांसाठी रात्रंदिवस राबत असताना, मित्रपक्षाकडून ठाकरे गटाकडून मात्र सहकार्य मिळत नाहीत, असा आरोप मनीष धुरी यांनी केला आहे. मनीष धुरी यांनी हे पत्र राज ठाकरे यांना दिले आहे.
एकीकडे जुन्या निष्ठावंत नेत्यांनी साथ सोडल्याने मनसे आधीच चिंतेत आहे. त्यातच आता मित्रपक्षाकडून होणाऱ्या या कोंडीमुळे अंधेरीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.