राज साहेब तुम्ही नेहमीच मान दिलात, पण दुर्देवाने… मनसेला मोठा धक्का, आणखी एका निष्ठावानाचा राजीनामा
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसला आहे. माहिमचे माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी स्थानिक पातळीवरील त्रासाला कंटाळून राज ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केली आहे. आता या महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वी मनसेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. मनसेचे नेते संतोष धुरी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता मनसेचे माहिम मतदारसंघातील पक्षाचे खंदे समर्थक आणि माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि माहिम प्रभाग क्रमांक १९० चे माजी नगरसेवक विरेंद्र विष्णू तांडेल यांनी आपल्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावेळी त्यांनी पत्र लिहित राज ठाकरेंकडे राजनीमा दिला आहे. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामात मिळणारी वागणूक वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विरेंद्र तांडेल यांच्या पत्रात काय?
मी विरेंद्र विष्णू तांडेल, प्रभाग क्रमांक १९०, माहीम, पक्षाच्या स्थापनेपासून नवनिर्माण सेनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत कार्यरत आहे. राज साहेब, आपल्या नेतृत्वाखाली मला नेहमीच मान, सन्मान व विश्वास मिळाला आहे. त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. मात्र सध्या माहीम विभागातील संघटनात्मक कामकाजात ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे, ती माझ्यासाठी अत्यंत अपमानास्पद व वेदनादायक ठरत आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली एकजूट, आपुलकी व संघभावना पूर्णपणे अभावाने दिसून येत आहे. त्यामुळे मला या संघटनेचा भाग असल्याची भावना राहिलेली नाही.
राज साहेब, आपण आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच मान-सन्मान दिला आहे, मात्र दुर्दैवाने तो मान आणि आपली विचारधारा मूळ पातळीवरील व्यवस्थापनात प्रतिबिंबित होताना दिसत नाही. यामुळे माझ्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, या परिस्थितीत पुढे काम करणे मला योग्य वाटत नाही. या सर्व बाबींचा सखोल विचार करून, कोणताही कटुता न ठेवता, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, तो आपण स्वीकारावा ही विनंती. राज साहेब, आपल्याबद्दल आणि आपल्या विचारांबद्दल माझ्या मनात सदैव आदर राहील, असे माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी म्हटले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकामागून एक निष्ठावान पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याने मनसे समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. माहिम हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र तिथेच अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक व्यवस्थापनातील नाराजी उघड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरेंद्र तांडेल यांच्या राजीनाम्यामुळे माहिममधील मनसेची ताकद कमी होणार की राज ठाकरे यावर काही नवीन रणनीती आखणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
