Santosh Dhuri : साथ राज ठाकरेंनी दिली, याचा अर्थ असा नाही की आम्हीच…संतोष धुरींच्या मनातली खदखद आली बाहेर
Santosh Dhuri : "मुंबईच्या जागा वाटपामध्ये मनसेला ज्या सीट पाहिजे, त्या सीट देण्यात आलेल्या नाहीत. शिवसेनेला संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त पाहिजे त्या सीट त्यांना देण्यात आलेल्या आहेत" असं संतोष धुरी म्हणाले.

“नितेश राणे यांच्याशी आधीपासून संपर्क होता. काही काम असल्यास आम्ही त्यांना सांगायचो. काल प्रवेश केल्यानंतर मी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. 2007 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती. कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. त्याप्रमाणे मी कुठली डिमांड ठेवलेली नाही. मला सीट मिळाली नाही म्हणून नाराज नाही” असं संतोष धुरी यांनी सांगितलं. काल त्यांनी अनेक वर्षांपासूनची मनसेची साथ सोडून भाजपत प्रवेश केला. “194 ही शिवसेनेला दिल्यानंतर 192 ही कोणासाठी? मागणी एवढी वाढली आणि त्यात 192 सीट घेण्यासाठी 194 ची जागा सोडण्यात आली. सचिन अहिर यांनी सांगितलं होतं, प्रत्येक विधानसभेत दोन जागा मिळणार आहेत. मग जागा का देण्यात आल्या नाहीत?” असा सवाल संतोष धुरी यांनी विचारला. “192 त्यांना पाहिजे होता, म्हणून ते कोणाचाही बळी द्यायला तयार होते. एखाद्याला सेट करायचं. त्यामुळे दुसऱ्या वरती अन्याय करायचा असा प्रकार घडलेला आहे. मी जी तयारी केली ती तयारी गुंडाळून मी आता बाहेर पडलेलो आहे” असं धुरी यांनी सांगितलं.
“जागा वाटपात आम्हाला जागा दिली नाही. परंतु नंतर आम्हाला कळलं की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी कुठे दिसले नाही पाहिजेत असा बाल हट्ट होता. त्यानंतर मनातून वाईट वाटलं आणि बाहेर पडलो. राजकारणात एकमेकांवर शिंतोडे उडवले जातात. त्याप्रमाणे या गोष्टी होतात. वरळी विधानसभेत आम्ही यांच्या विरोधात लढलो होतो. आमच्यावरती बोलले या गोष्टी लक्षात ठेवून असं वागायचं आणि हा राग त्यांनी काढलेला आहे, आणि या गोष्टीला साथ राज ठाकरे यांनी दिली” असं संतोष धुरी म्हणाले.
याचा अर्थ असा नाही की आम्हीच फक्त गप्प राहायचं
“तरी यांच्यासोबत राहायचं आम्ही सगळं का विसरायचं? सात नगरसेवक नेले. आमच्या घरी पोलीस पाठवायचे. आम्हाला तडीपार केले. आम्ही शांत राहिलो मराठी माणसांसाठी एकत्र येत आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्हीच फक्त गप्प राहायचं. आम्ही सगळं विसरायचं” अशा शब्दात संतोष धुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सगळ्यात मोठं नुकसान राज ठाकरेंचं
“मुख्यमंत्री बरोबर बोलले आहेत. यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान राज ठाकरेंचं होणार आहे. 52 जागा मनसेला दिलेल्या आहेत पण त्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत? या देखील पहिल्या पाहिजेत. त्याचा सर्वे केला पाहिजे” असं संतोष धुरी म्हणाले.
