ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान मातोश्रीवर काय घडायचं? दोन किल्ले खरंच सरेंडर झाले का? ठाकरेंच्या नेत्याने धुरींच्या आरोपातील हवाच काढली
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, धुरी यांची टीका म्हणजे 'भाजपची स्क्रिप्ट' असल्याचे म्हटले आहे.

मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत काल संतोष धुरी यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी संतोष धुरी यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला आहे. वांद्र्यात तह झाला आणि साहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले. त्यातील एक संतोष धुरी आणि दुसरा संदीप देशपांडे, असा गंभीर आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. आता या गंभीर आरोपांवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपने दिलेल्या स्क्रिप्टवर बोलावं लागतंय
सचिन अहिर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संतोष धुरी यांच्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी संतोष धुरी हे दोन्ही कुटुंबाने एकत्र यायला हवे, अशी भावना व्यक्त करत होते. फक्त एका निवडणुकीची एक सीट मिळाली नाही, त्यामुळे ते अशी टीका करतात. आरोप करतात. ज्या पक्षात आलेत त्यातून त्यांना अशी स्क्रिप्ट दिल्याने त्यांना ते बोलावं लागत आहे, असा घणाघात सचिन अहिर यांनी केला.
पण एक दुर्देवी गोष्ट अशी आहे की काही मर्यादा पाळली पाहिजे. त्यांना जी जागा हवी होती ती आमची सिटींग सीट होती. जर विश्लेषण करायचं झालं तर दादरमध्ये ज्या जागा मनसेने मागितल्या होत्या. त्या दोन्ही प्रभागात आमचे नगरसेवक हे आमच्या चिन्ह्यावर निवडून गेलेले आहेत. तरीही यशवंत किल्लेदार यांच्यासाठी एक सीट आम्ही सोडली. त्यामुळे अर्थात आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. ते ज्येष्ठ शिवसैनिक होते. पण नाईलाजाने त्यांना दुसरा निर्णय घ्यावा लागला. असे असतानाही पूर्ण पक्ष ताकदीने यशवंत किल्लेदारांच्या मागे उभा आहे. तिकडे काम करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही सचिन अहिर म्हणाले.
आपल्या नेत्यांवर टीका करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न
एक सीट नाही मिळाली, ज्या सीटशी त्यांचा काही संबंध नाही. ते ज्या प्रभागाचे माजी नगरसेवक होते आणि ते ज्या प्रभागासाठी काम करत होते, तिथे आरक्षण झाले. त्यामुळे आता सीट नाही मिळाली म्हणून आपल्या नेत्यांवर टीका करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. भाजपची स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा तिथे वस्तूस्थिती काय हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असा टोलाही सचिन अहिर यांनी लगावला.
पाच महिन्यानंतर त्यांना कोणता साक्षात्कार झाला
एका प्रभागात त्यांना निवडणुकीसाठी लढायचं होतं, त्याबद्दल ते चर्चा करत होते. पण शेवटी आता कोणता प्रभाग सोडायचा, तेव्हा तडजोडीची भूमिका असते, सीटसाठी आपण भांडण करतोय हे चित्र बाहेर जाऊ नये, अशी उद्घव ठाकरेंची भूमिका होती. आमच्या ज्या सीटिंग सीट होत्या, त्यादेखील काही आम्ही सोडल्या. गेल्या चार पाच महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची गणित सुरु आहेत. मग त्यांनी उशिरा पक्षप्रवेश का केला? जेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु झाली तेव्हा त्या सर्व प्रक्रियेत ते होते. या सर्व प्रक्रियेत त्यांनी पुढाकार घेण्याचा काम त्यांनी केलं आहे. त्यांनी सर्व कामही केली. अचानक पाच महिन्यानंतर त्यांना कोणता साक्षात्कार झाला. आता त्यांनी कुठे ब्लड टेस्ट केली हे पाहावं लागेल, असेही सचिन अहिर यांनी म्हटले.
याला बोलवा, त्याला बोलवू नका असे कुठेही झालेले नाही
कोणी कुठल्या पक्षाने कोणत्या नेत्यांना आणायचं अशी कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्याकडून अनिल परब, वरुण सरदेसाई हेच दोघे चर्चा करण्यासाठी गेले. अंतिम चर्चा नेत्यांमध्ये झाली. आम्हाला जी काही चर्चा करायची होती, ती आम्ही आमच्या नेत्यांसोबत केली. त्यांच्या वतीने बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे दोन नेते चर्चेत होते. धुरी यांनी त्यांची भूमिका काय ते त्यांच्याकडे मांडायला हवी होती. आमच्याकडून कोणत्याही प्रकारे याला बोलवा, त्याला बोलवू नका असे कुठेही झालेले नाही, असेही स्पष्टीकरण सचिन अहिर यांनी दिले.
