वांद्र्यात तह, मनसे सरेंडर अन् संदीप देशपांडे… भाजपात प्रवेश करताच संतोष धुरींनी सगळचं काढलं
मनसेचे फायरब्रँड नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरेंनी पक्ष दुसऱ्याच्या ताब्यात दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी आपली पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरी यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागची खदखद व्यक्त केली. त्यासोबत त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर अत्यंत गंभीर आरोप केले.
आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला
संतोष धुरी यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर धुरी यांनी त्यांनी पक्ष का सोडला, यामागचे मूळ कारण काय होते, याबद्दल सविस्तरपणे भाष्य केले. २००७ मध्ये आम्ही राज ठाकरेंसोबत बाहेर पडलो. पहिले आम्ही शिवसेनेत होतो, नंतर मनसेत आलो आणि कार्य चालू ठेवलं. आमचं रक्त भगवं आहे. पण आता ज्या पद्धतीने युती झाली आहे, ज्या लोकांनी हिरव्या लोकांशी युती केली, त्यामुळे त्यांच्यातील लोक तुटून गेली. त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला. पण अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं. त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतला आहे. आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला आहे, असा आरोप संतोष धुरी यांनी केला.
यावेळी संतोष धुरी यांनी जागावाटपात मनसेला दुय्यम वागणूक मिळाल्याचा दावा केला आहे. आम्हाला ज्या सीट दिल्यात, दिसायला आकडा ५२ आहे. पण त्यातील ७ ते ८ जागा येतील की नाही ही शंका आहे. आम्हाला ज्या सीट हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप जिथे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, तिकडे आम्ही दोन सीट मागितल्या होत्या. पण त्यांनी आम्हाला एक सीटवर बोळवण केली, असे संतोष धुरी म्हणाले.
हे सर्व वांद्र्यावरुन सांगण्यात आलं
आम्हाला या चर्चेत सहभागी केलं नाही. मला सीट नाही दिली याचा मला राग नाही. संदीप देशपांडे यांना कोणत्याही चर्चेत सहभागी केलं नाही. जेव्हा विचारलं तेव्हा आम्हाला असं समजलं की वर तह झाला आहे की साहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले आहेत. त्यातील एक संतोष धुरी आणि दुसरा संदीप देशपांडे. हे दोन किल्ले सरेंडर केले आहेत. हे सर्व वांद्र्यावरुन सांगण्यात आलं, असा गंभीर आरोप संतोष धुरींनी केला.
आपल्याला कुठेही स्थान देणार नाही
वांद्र्याच्या बंगल्यावरुन सांगण्यात आलं की हे दोघेजण कुठेही दिसले नाही पाहिजेत. कोणत्याही चर्चेत दिसायला नाही पाहिजे. उमेदवार म्हणून दिसले नाही पाहिजेत. देशपांडे उमेदवारी करणारच नव्हते. पण संतोष धुरीही कुठे दिसले नाही पाहिजे, असा तह झाला. हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा मी संदीप देशपांडे यांना सांगितलं की इथे राहण्यात काय अर्थ आहे? आधीच त्यांनी काँग्रेससोबत जाऊन स्वत:च रक्त हिरवं केलं आहे. आता परत इथे येऊन आपलंही रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला कुठेही स्थान देणार नाही. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीप देशपांडे यांनी मला तुझा तू विचार कर असे सांगितले. त्यांचं मन खूप मोठं आहे. मी येणार नाही, अशाप्रकारे मी यातून बाहेर पडलो, असे संतोष धुरी म्हणाले.
