Mumbai Rains: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागांमध्ये साचले पाणी

सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. | Mumbai Rain

Mumbai Rains: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागांमध्ये साचले पाणी
प्रातिनिधिक फोटो


मुंबई: हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे. (Rain Updates in Mumbai and suburban area)

सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.


तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील 103 दरडग्रस्त गावांना धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या स्थलांतरांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

समुद्र, खाडीकिनारी राहण्याऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या 

हवामान विभागाकडून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, ठाण्यात यंत्रणा सज्ज, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Weather Alert: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मान्सूनचं आगमन होणार

(Rain Updates in Mumbai and suburban area)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
No liveblog updates yet.

    Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI