आता मुंबई, नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो, परवानगी मिळाली, खर्च किती? मोठी अपडेट समोर
Mumbai New Metro Project : छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई हे नवी मुंबई विमानतळ यादरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई हे नवी मुंबई विमानतळ यादरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता मिळाली आहे. आता लवकरच या मेट्रोच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. पुढील साडे तीन वर्षात हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाणे आणखी सोपे होणार आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी किती खर्च येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यानच्या मेट्रो प्रकल्पावर माहिती देताना म्हटले की, ‘आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई हे नवी मुंबई विमानतळ यादरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिली आहे. यात अनेक महत्त्वाची स्थानके आहेत, त्यामुळे रहदारीचा मोठा भाग आहे त्यालाही मेट्रो कव्हर करणार आहे. पीपीपी तत्त्वावर ही मेट्रो तयार करत आहोत.’
17 ते 18 हजार कोटींचा खर्च
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘साधारण ही मेट्रो 5 वर्षात पूर्ण होईल असा अंदाज आहे, पण साडेतीन वर्षात काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या आहेत. यातील 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस जंक्शनसुद्धा याला जोडले जाणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि उर्वरित संपूर्ण मुंबईला जोडणारा हा मेट्रो प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी 17 ते 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.’
35 किलोमीटर मार्गावर 20 स्थानके
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असणार आहे. यापैकी भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमीचा असेल. या मेट्रोमार्गावर एकूण 20 स्थानके असतील. यातील 6 स्थानके भूमिगत तर 14 स्थानके उन्नत असणार आहेत. या नवीन मार्गामुळे विमान प्रवाशांना फायदा होणार आहे तसेच शहरातील इतर प्रवाशांनाही फायदा होणार आहे.
