भावाची ओळख, एक कॉल अन्…, मुंबईत क्रिप्टो करन्सीचा सर्वात मोठा फ्रॉड, बिझनेसमॅनसोबत काय घडलं?
विश्वास ठेवणे पडले महागात! भावाच्या ओळखीवर विश्वास ठेवून मुंबईतील व्यावसायिकाने एका कॉलवर गमावले ९० लाख रुपये. USDP क्रिप्टो स्कॅमची धक्कादायक कहाणी वाचा.

क्रिप्टो करन्सीमध्ये बक्कळ नफा मिळवण्याचे खोटे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला तब्बल ९० लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकूण ८ आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आर्थिक गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
राजेश बांभानिया (३५) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बांभानिया यांची ओळख त्यांच्या भावामार्फत मुख्य आरोपी ध्रुव मेहता याच्याशी झाली. मेहताने अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने त्यांच्याशी संपर्क साधला. ध्रुव मेहताने बांभानिया यांना सांगितले की, ‘यूएसडीपी’ (USDP) नावाच्या विशिष्ट क्रिप्टो करन्सीचा वापर कपड्यांच्या व्यवहारात केल्यास खूप मोठा आणि जलद नफा मिळतो. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करा, असे त्याने बांभानिया यांना सांगितले.
जर तुम्हाला एक लाख रुपयांच्या किमतीची यूएसडीपी करन्सी खरेदी करायची असेल, तर त्यासाठी त्यांना एकूण ९० लाख २० हजार रुपये इतकी मोठी रक्कम लागेल, असे ध्रुवने बांभानिया यांना सांगितले. यात मोठा नफा मिळण्याच्या आशेने बांभानिया यांनी ही रक्कम देण्याची तयारी दर्शवली. आरोपींनी बांभानिया यांना अंधेरी पूर्वेकडील टिम्मी आर्केड येथे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बोलावले. या भेटीत, आरोपींनी बांभानिया यांना सांगितले की, ते दिलेली रक्कम तातडीने ऑनलाईन क्रिप्टो करन्सी लिंकवर ट्रान्सफर करतील. त्याबदल्यात यूएसडीपी करन्सी मिळेल.
व्यवहार सुरू असताना, आरोपींनी बांभानिया यांच्याकडून सुरुवातीला २० लाख रुपये घेतले. हे पैसे मिळाल्यावर आरोपींनी प्रत्यक्षात कोणतीही क्रिप्टो करन्सी ट्रान्सफर न करता, केवळ करन्सी पाठवल्याचे नाटक केले. त्यानंतर तातडीने घटनास्थळावरुन फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश बांभानिया यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
यावेळी पोलिसांनी मुख्य आरोपी ध्रुव मेहता याच्यासह अँथोनी, साहिल, मजद शेख, अजगर हुसेन, शेख रफाक, मनोज प्रजापती आणि मोहम्मद सीम खान अशा एकूण आठ जणांविरुद्ध फसवणूक (कलम ४२०) आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत. एमआयडीसी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
