मुंबईकरांनो आता ट्राफिक जॅमची समस्या विसरा… लवकरच सुरु होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास
मुंबईत देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी दरम्यान ही सेवा उपलब्ध असेल. एमडीएल आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा सुरू होत आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अनेक विकासाचे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील पहिलीवहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच मुंबईत सुरु होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. नुकतंच याबद्दल माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) आणि जेएनपीटी यांच्यात एक करार करण्यात आला. या करारनंतर आता पुढील महिन्यांपासून ई-वॉटर टॅक्सी ही सेवा नियमितपणे सुरू केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना ई-वॉटर टॅक्सीचा अनुभव घेता येणार आहे.
मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सुरु झाल्यानंतर मुंबईकरांसाठी एक नवीन वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच या नवीन वाहतूक मार्गाच्या पर्यायाने मुंबईत सातत्याने उद्भावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सुरु होणार असल्याने मुंबईकरांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे जलमार्गांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल, असेही बोललं जात आहे.
इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची वैशिष्ट्ये
मुंबईत सुरु होणारी ई-वॉटर टॅक्सी १३.२७ मीटर लांब आणि ३.०५ मीटर रुंद असणार आहे. या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमधून 25 प्रवाशी प्रवास करू शकतात. यामध्ये ६४ किलोवॅटची बॅटरी असणार आहे. ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी एकदा चार्जिंग केल्यावर ४ तास चालू शकते. या टॅक्सीचा वेग १४ नॉट्सपर्यंत असणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा म्हणजे एसीची सेवा उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
मुंबईकरांना जलमार्गाने करता येणार प्रवास
विशेष म्हणजे मुंबईतील ही ई-वॉटर टॅक्सी पर्यावरणपूरक असणार आहे. तसेच ही ई-वॉटर टॅक्सी प्रदूषण मुक्त असेल. विशेष म्हणजे सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मात्र ई-वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रीकवर असल्याने ती फारच किफायतशीर असेल. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल. या ई-वॉटर टॅक्सीमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवी क्रांती घडून येईल. या ई-वॉटर टॅक्सीमुळे आता मुंबईकरांना जलमार्गाने प्रवास करता येणार आहे.
विशेष म्हणजे जर ई-वॉटर टॅक्सी ही योजना मुंबईत यशस्वी झाली तर भविष्यात मुंबईतील इतर भागातही ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.