राजधानी मुंबई आता भिकारीमुक्त होणार! मुंबई पोलिसांची मोहीम

सागर जोशी

|

Updated on: Feb 14, 2021 | 4:54 PM

रस्त्यांवरील भिकाऱ्यांना पकडून त्यांना चेंबूरच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येणार आहे. तिथे त्यांचं समुपदेशन करुन त्यांची योग्य सोय केली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

राजधानी मुंबई आता भिकारीमुक्त होणार! मुंबई पोलिसांची मोहीम

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकीकडे गगनचुंबी इमारती, भरधाव वेगानं सुसार धावणाऱ्या महागड्या गाड्या, सुटाबुटात वावरणारा श्रीमंत वर्ग, तर दुसरीकडे फुटपाथवर आयुष्य काढणारे, रस्त्यांवर, ट्राफिक सिग्नलवर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूत नजरेने पाहणारे भिकारी, असं परस्पर विरोधी चित्र पाहायला मिळतं. पण कदाचित हे चित्रं आता पुढील काही दिवसांत मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाही. कारण, मुबंई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.(Mumbai Police’s campaign against beggars in Mumbai)

भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडणार

रस्त्यांवरील भिकाऱ्यांना पकडून त्यांना चेंबूरच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येणार आहे. तिथे त्यांचं समुपदेशन करुन त्यांची योग्य सोय केली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून भिकाऱ्यांना पकडून त्यांना भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येत आहे.

भिकाऱ्यांची कोरोना चाचणी होणार

दरम्यान, भिकाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नांगरे-पाटलांच्या आदेशानुसार भिकाऱ्यांना पकडण्याची कारवाईही सुरु झाली आहे. त्यानुसार आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून शनिवारी 14 भिकाऱ्यांना पकडण्यात आलं. या भिकाऱ्यांना कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करुन त्यांनी भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांची भिकाऱ्यांविरोधातील ही मोहीम पूर्ण फेब्रुवारी महिन्यात हाती घेतली जाणार आहे.

भिक मागण्यासाठी अनेकदा लहान मुलांचा वापर

भिक मागण्यासाठी अनेकदा लहान मुलांचा वापर केला जातो. अशाप्रकारे लहान मुलांचा वापर करुन पैसे कमवणाऱ्या टोळ्या मुंबईत तयार झाल्या आहेत. त्यांच्याकडून अनेकदा लहान मुलांचं अपहरण करुन त्यांना भिक मागण्यासाठी भाग पाडलं जातं. त्यामुळे नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यामार्फत भिकाऱ्यांना पकडून त्यांना भिक्षेकरी सेवा केंद्रात पाठवलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

IPS विश्वास नांगरे पाटील ‘सिल्वर ओक’वर, धनंजय मुंडे प्रकरणात पवारांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Vishwas Nangare Patil | मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले?

Mumbai Police’s campaign against beggars in Mumbai

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI