नितीश कुमारांना उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली का?; शरद पवारांचं थेट उत्तर
Sharad Pawar on Nitish Kumar Phone About Loksabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतो आहे. अशात विविध घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

देशात सर्वात मोठा लोकशाही उत्सव होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. अशात आता देशात कुणाचं सरकार येणार? याची सर्वत्र चर्चा होतेय. अशात इंडिया आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची बातमी आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केला आणि उपपंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची बातमी आली. यावर आता खुद्द शरद पवारांनीच भाष्य केलं आहे. लोकसभेची मतमोजणी सुरु असतानाच शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत.
नितीश कुमारांना फोन केला?
नितीश कुमारांशी चर्चा केली का? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. तेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं नाही. ते एका राज्याचे प्रमुख आहेत. अधिक माहिती नाही. त्यामुळे बोलणार नाही. त्यांच्याशी माझे संबंध आहेत. पण त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं शरद पवार म्हणाले.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशीहील शरद पवारांचं फोनवर बोलणं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावरही शरद पवारांनी उत्तर दिलंय.मी चंद्राबाबूंशी बोललो नाही. त्यात तथ्य नाही. माझं बोलणं फक्त काँग्रेसच्या अध्यक्षांशी झालं. या चर्चा करण्याचं धोरण आमच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांशी चर्चा करूनच घेऊ, असं शरद पवार म्हणाले.
निकालावर काय म्हणाले?
लोकसभेच्या निकालावरही शरद पवारांनी भाष्य केलं. या पेक्षा वेगळा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. बारामतीत माझं साठ वर्षाचं असोसिएशन आहे. प्रचार करो ना करो, सामान्य नागरिकाची मानसिकता मला माहीत आहे. मी जावो अथवा न जाओ तो योग्य निर्णय घेईल याची खात्री आम्हाला होती, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राचा निकाल चांगला आला. आम्हाला उत्तर प्रदेशात चांगला निकाल मिळेल याचा विचार केला नव्हता. हिंदी बेल्टमध्ये अधिक मेहनत करण्याची गरज आहे, असं वाटायचं. पण निकालाने काही सुधारणा झाली असं दिसतंय. पण मध्यप्रदेश आणि काही भागात सुधारणा करण्याची गरज आहे. पण उत्तर प्रदेशने आम्हाला गाईडलाईन दिली, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
