बीडीडी चाळीतील घरांसाठी लॉटरी, रहिवाशांना करारपत्र मिळणार

BDD Chawal | बीडीडी प्रकल्पातील पात्र रहिवाशांना पुनर्वसित इमारतीत कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर मिळणार हे ठरविण्यासाठी पुनर्वसित इमारती बांधून पूर्ण होण्याआधीच सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीडीडी चाळीतील घरांसाठी लॉटरी, रहिवाशांना करारपत्र मिळणार
बीडीडी चाळ


मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी 20 ऑक्टोबरला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात ही सोडत होणार असून एका चाळीतील केवळ पाच सदस्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर सोडतीसाठी उपस्थित राहता येईल.

बीडीडी प्रकल्पातील पात्र रहिवाशांना पुनर्वसित इमारतीत कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर मिळणार हे ठरविण्यासाठी पुनर्वसित इमारती बांधून पूर्ण होण्याआधीच सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार काही महिन्यांपूर्वी ना.म. जोशी मार्ग येथील 272 पात्र रहिवाशांना सोडतीद्वारे घराची हमी देण्यात आली आहे. ही सोडत झाल्यानंतर घरांची ऑनलाइन नोंदणी करत सोडतीतील पात्र रहिवाशांना करारपत्र वितरित करण्यात येतील.

पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार

शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहे. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे.  प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.

प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + 6 मजली पोडियम पार्किंग व 2 प्रशस्त जिने

खिडक्यांसाठी पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे.  प्रत्येक इमारतीमध्ये 3 पॅसेंजर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट व 1 फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + 6 मजली पोडियम पार्किंग व 2 प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंप रोधक असणार आहेत.

संबंधित बातम्या:

‘घरं नाही तर, मतं नाही’, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलिसांच्या कुटुंबियांचा एल्गार, मनसेचा जाहीर पाठिंबा

गृहनिर्माण मंत्री पोलीस परिवारांच्या भेटीला, पोलिसांना हक्काचे घरं लवकरच मिळणार, जितेंद्र आव्हाडांचे आश्वासन

बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI