VIDEO: भाजप-एनसीबीच्या संगमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

भाजप आणि एनसीबीच्या संगनमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. (Nawab Malik escalates attack on BJP, NCB in Mumbai drug bust case)

VIDEO: भाजप-एनसीबीच्या संगमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
nawab malik


मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि भाजपवर जोरादर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि एनसीबीच्या संगनमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. एनसीबी आणि भाजपच्या संगमताने बॉलिवूडला बदनाम करणे आणि बऱ्याच लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे काढण्याचे उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच कुणाचे कुणाशी काय लागेबांधे आहेत, याची माहिती मी पुढील काळात देणार आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

देशात कायद्याचं राज्य आहे की नाही?

भाजपचे लोक आधी सांगतात त्यानंतर कारवाया होत आहेत. म्हणजे ठरवून कारवाया होत आहेत हे स्पष्ट होत असून यापेक्षा वेगळ्या पुराव्याची गरज नाही. भाजपचे लोक एनसीबीचे अधिकारी बनून लोकांना हाताला धरून नेत आहेत. एनसीबीचे लोक फरारी आरोपीची साथ घेत आहेत. म्हणजे या देशात कायद्याचं राज्य आहे की नाही हा मोठा प्रेश्न चिन्हं निर्माण झाला आहे, असा सवाल त्यांनी केला.

कितीही धाडी टाका घाबरणार नाही

कितीही धाडी टाकल्या तरी आम्ही काही घाबरत नाही. या देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण केली जात आहे. राज्यातील मराठी माणसाला उद्योग धंदे करण्याचा अधिकार नाही का हा प्रश्न निर्माण होत आहे. एका विशेष वर्गाला वर्ण व्यवस्थेने व्यापार धंदा करण्याचे अधिकार दिले आहेत, तेच हा व्यवसाय करतील असं पाहिलं जात आहे. बहुजन समाजातील लोकं धंदा करू शकत नाही. धंद्यात आले तर तुमच्या मागे ईडी लावू, सीबीआय लावू, असे प्रकार सुरू आहेत. मला वाटतं आता परिवर्तन झालं आहे. देशात प्रत्येकाला उद्योगधंदे करण्याचा अधिकार आहे. कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी कोणी घाबरणार नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राचा बंगाल करण्याचा प्रयत्न

ज्यापध्दतीने अजित दादांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. काल जाहीर झालेला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असला तरी 70 टक्के जागा जनतेने महाविकास आघाडीतील पक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे जितकं आम्हाला केंद्रातील भाजप सरकार टार्गेट करेल बंगालसारखी परिस्थिती या राज्यात निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र बंद

लखीमपूरमधील घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यातील जनता केंद्रातील भाजपच्या जुलमी सरकारच्याविरोधात जोरदार पाठिंबा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

झेडपी, पंचायत समितीचा निकाल आणि आयटीच्या छाप्याचा संबंध आहे का? रोहित पवारांचा खोचक सवाल

मुनगंटीवार, शेलार, गावित, वाघ यांना भाजपकडून राष्ट्रीय राजकारणात संधी, राणेंना कार्यकारिणीत स्थान नाही

ZP निवडणुकीत बाजी मारली, आता महानगपालिकेसाठी प्लॅन तयार, नागपुरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला

(Nawab Malik escalates attack on BJP, NCB in Mumbai drug bust case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI