झेडपी, पंचायत समितीचा निकाल आणि आयटीच्या छाप्याचा संबंध आहे का? रोहित पवारांचा खोचक सवाल

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल कालच लागला. त्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तर लगेच दुसऱ्या दिवशी छापे पडले. त्यामुळे कालचा निकाल आणि आजच्या छाप्याचा काही संबंध आहे का हे पाहावं लागेल, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.

झेडपी, पंचायत समितीचा निकाल आणि आयटीच्या छाप्याचा संबंध आहे का? रोहित पवारांचा खोचक सवाल
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस


अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी केलीय. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी, कार्यालयावरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या छापेमारीमुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, या छापेमारीवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. (Rohit Pawar criticizes BJP over Income tax department raids Ajit Pawar and his associates)

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल कालच लागला. त्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तर लगेच दुसऱ्या दिवशी छापे पडले. त्यामुळे कालचा निकाल आणि आजच्या छाप्याचा काही संबंध आहे का हे पाहावं लागेल. राजकीय हेतूनं हे होत असेल तर लोक त्याला कंटाळली आहे. अशाप्रकारे वागणं योग्य नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी आयकर विभागाच्या कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधलाय.

अजित पवारांची प्रतिक्रिया काय?

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे, ज्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत – जयंत पाटील

अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय.

कोणकोणत्या ठिकाणी छापेमारी?

पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया, अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे घर, अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

कोणत्या कारखान्यांवर छापेमारी?

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

इतर बातम्या :

होय, माझ्याही कंपन्यांवर आयकरने धाडी टाकल्या : अजित पवार

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी; जयंत पाटलांचा दावा

Rohit Pawar criticizes BJP over Income tax department raids Ajit Pawar and his associates

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI