दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंना क्लीन चीट
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, असं पोलिसांनी म्हटलंय.

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे नमूद केलं आहे. तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचं म्हटलं आहे.
सूडबुद्धीने याचिका- आदित्य ठाकरे
दरम्यान दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपलं नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आलं आहे. आपल्याविरोधात द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी, निरर्थक याचिका केल्याचा दावाही ठाकरेंनी केला आहे.
सतीश सालियन यांचा याचिका फेटाळण्याची विनंती
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला की, 8 जून 2020 रोजी दिशाने तिच्या घरात एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला आदित्य ठाकरे, त्यांचे बॉडीगार्ड, अभिनेता सूरज पांचोली आणि डिनो मोरिया यांच्यासह इतर कलाकार उपस्थित होते. दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिच्यावर लैगिक अत्याचार झाले, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. परंतु दिशाच्या वडिलांनी केलेले सामूहिक बलात्काराचे आरोप निराधार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितलं. नगरकर यांनी स्पष्ट केलं की 2020 चा क्लोजर रिपोर्ट हा वैज्ञानिक तपासणी आणि बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटरने जारी केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आधारित होता, ज्यामध्ये लैंगिक अत्याचार किंवा शारीरिक हल्ल्याची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. परंतु त्यातही कोणत्याही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत, असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यांचा हवाला देऊन एसआयटीने न्यायालयाला सतीश सालियन यांची याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे.
परंतु पोलिसांचा हा तपास अपुरा होता, असं म्हणत वकील नीलेश ओझा यांनी याचिकेला आव्हान दिलं आहे. त्यामुळे न्यायालयाने पुढील युक्तिवादासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.
कोण होती दिशा सालियान?
कर्नाटकच्या उडुपी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं. याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.
