Narendra Modi : ‘ज्यांना शांती आणि सुरक्षा हवी, त्यांना सांगतो…’, नरेंद्र मोदी शिवाजी पार्कच्या सभेत नेमकं काय म्हणाले?
"जे अशक्य वाटायचं. ते शक्य झालं की नाही? हे कुणी केलं? कोणती ताकद आहे ज्याने हे केलंय? मोदी नाही. तुमच्या मतांच्या ताकदीमुळे झालं. तुमच्या मतांचं सामर्थ्य आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भाषण करताना म्हणाले.

महायुतीची मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर आज ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं. “भारतातील लोक विचाराने पक्के होते, निश्चयाने पक्के होते. एक स्वप्न घेऊन पाचशे वर्ष लढत राहिले, हे जगाला मान्य करावं लागेल. हा छोटा संघर्ष नाही. अनेक पिढ्यांचा संघर्ष, लाखो लोकांचं बलिदान… पाचशे वर्षापासूनचे स्वप्न… आज रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान आहे. नैराश्येच्या गर्तेत बुडालेले हे लोक आहे. त्यांना आर्टिकल ३७० रद्द होईल असं वाटत नव्हतं. ३७० कलमाची भिंत मी कब्रस्तानात गाडली आहे. ३७० कलम पुन्हा लागू करण्याचे काही लोक स्वप्न पाहत आहेत. त्यांनी कान उघडे करून ऐकावं. ही विरासत मामूली नाही. जगातील कोणतीही ताकद पुन्हा ३७० कलम लागू करू शकत नाही. आपल्या देशात नेहमी बॉम्बस्फोट होत होता. मुंबई शहर घाबरत होते. एखादी बेवारस दिसली की पोलिसांना बोलावलं जात होतं. बेवारस वस्तूंना हात लावू नका, असं सांगितलं जात होतं. गेल्या दहा वर्षात तुम्ही ऐकलंय का असं? त्यांना हे कठीण वाटत होतं”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.
“तीन तलाक… देशाच्या संसदेने तीन तलाकलाच तलाक दिला. महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. ४० वर्ष लोक वाट पाहत होते. फक्त संसदेत चर्चा व्हायची. आज संविधान घेऊन नाचणाऱ्यांनी ३३ टक्के आरक्षणाचं विधेयक फाडलं होतं. या सर्वांच्या छाताडावर बसून आरक्षण दिलं की नाही?”, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.
‘ज्यांना शांती आणि सुरक्षा हवी, त्यांना सांगतो…’
“जे अशक्य वाटायचं. ते शक्य झालं की नाही? हे कुणी केलं? कोणती ताकद आहे ज्याने हे केलंय? मोदी नाही. तुमच्या मतांच्या ताकदीमुळे झालं. तुमच्या मतांचं सामर्थ्य आहे. त्यामुळे ज्यांना मुलांचं उज्ज्वल भविष्य हवं, ज्यांना शांती आणि सुरक्षा हवी, त्यांना सांगतो, तुम्ही घरातून बाहेर या आणि मतांचा उपयोग करा. माझा तुम्हाला आग्रह आहे, मी मुंबईकरांच्या जवळ आलोय. तुमचे आशीर्वाद मागायला आलोय. तुम्ही प्रचंड मतदान करा”, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
“तुम्ही जेव्हा मतदान करायला घरातून निघाल तेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे, घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा येऊ की नाही याचा भरवसा नसायचा. हे लक्षात ठेवा. कमळावर शिक्का मारून मोदींना मजबूत करा. तुमचं एक मत राष्ट्र हितात मोठे निर्णय घेण्यास आधार बनला आहे. आता मराठीतही मेडिकलचा अभ्यास शक्य होईल. मी सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं की तुमच्या निकालाचा ऑपरेटिव्ह पार्ट पक्षकाराला त्याच्या भाषेत द्या म्हणून सांगितलं. आज ते सुरू होत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
