
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. मराठी- अमराठी वाद उद्भवण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात या मुद्यावर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती अलर्ट मोडवर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मराठी मताचा फटका बसू नये यासाठी मोठी खेळी खेळण्यात येत आहे. ठाकरेंच्या ठाकरेंच्या मेळाव्यानंतर महायुतीचे तीन्ही प्रमुख नेते अलर्ट झाले आहेत. निवडणुकांसाठी आणि ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन महापौरवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहेत. मुंबईत काय घडतायेत घाडमोडी?
लोकसंख्येवर मनपा निवडणुकीचा फॉर्म्युला
ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज्यात, विशेषतः मुंबई पट्ट्यात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसंख्येवर महापालिका निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार आहे. मुंबईत मराठी ३२%, मुस्लिम १४% आणि उर्वरित ५४% मतदार अमराठी आहेत. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय हे आधीपासूनच भाजप समर्थक आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत मराठी-अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता आहे.
मीरा-भाईंदरमध्ये आंदोलन पेटले
मीरा-भाईंदरमध्ये मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी नाकारल्यानंतर वातावरण चिघळलं आहे. अनेक मनसे कार्यकर्ते आणि आंदोलकांची धरपकड सुरू आहे. मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आहे. पोलिसांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती का असा सवाल त्यांनी केला. मराठी माणसावर अन्याय होत असल्याचा आरोप करत अनेक जण रस्त्यावर आले आहेत.
काय आहे फॉर्म्युला?
मराठी-अमराठी वाद पेटला तर महायुतीने त्यावर महापालिकेत विजय मिळवण्यासाठी आणि मते मिळवण्यासाठी खास प्लॅनिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, असा वाद पेटला तर भाजपने अमराठी मतांची तयारीत करावी तर राष्ट्रवादी यांनी बहुजन आणि पुरोगामी मतांची तयारी करावी तर शिवसेनेनं ठाकरेंच्या वाटेची मराठी मतं आपल्याकडे कशी वळतील याच्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपा निवडणुका ह्या पक्षाचा बॅनरवर कमी पण व्यक्ती विषेशवर जास्त अवलंबून असल्याने जिंकणारेच उमेदवार मैदानात उतरवा यावर तिन्ही महायुतीच्या नेत्यांची सहमती झाल्याचे समोर येत आहे. पुढच्या आठवड्यापासून तिन्ही पक्षांकडून उमेदवारांचा सर्वे केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.