
Raj Thackeray on Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार यांनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. अजितदादा पवार यांचा विमान अपघात की घातपात या मुद्दावर त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. रोहित पवार यांनी या भेटीची माहिती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. FIR ला सरकार का घाबरतंय? असा रोकडा सवाल त्यांनी सरकारला केला. तर सरकारच्या या भूमिकेमुळे काय होत आहे, यावर त्यांनी भाष्य केलं. लोकांच्या मनात अजितदादांच्या विमान घातपाताची शंका का दाटत आहे ,यावर त्यांनी मोठं वक्तव्य केलं.
एफआयआर का नोंदवून घेतला जात नाही?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार हे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना गुन्हा का नोंदवला जात नाही, असा महत्त्वाचा प्रश्न विचारला. सरकारच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. एफआयआर का नोंदवून घेतला जात नाही. तीन तीन ठिकाणी दबाव का ठेवला जात आहे, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. त्यांचा एफआयआर नोंदवला जात नसेल तर सामान्य माणसाचं काय करायचं. आपल्यातील एक व्यक्ती गेली. दुर्देवी अपघात झाला. कुणाचाच अपघात होऊ नये. इतका दुर्देवी होऊच नये. अशावेळी एफआयाआरमध्ये काही त्रुटी मांडायच्या असेल त्या मांडल्या जाऊ देत नसतील तर महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला आहे. सरकारच अधिकार्यांना एफआयआर नोंदवून घेतलं जाऊ देत नाही तर अधिकार्यांना दोष देऊन काय फायदा असेही राज ठाकरे म्हणाले.
तर मग काळंबेरं…
सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसेल आणि अजितदादांसारख्यांबाबत तर यात काही काळंबेरं आहे का. असल्या गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात याच कारणाने संशय निर्माण होत आहे असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी सरकारचाच अगोदर कान धरला आहे. राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळेच जनतेच्या मनात घातापाताविषयी काळंबेरं असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.
सुनेत्रा पवार यांनी बोलायला हवं
राज ठाकरे यांनी केवळ सरकारला जाब विचारला नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कोर्टातही चेंडू टाकला आहे. तीन ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. तिथे नकार दिला जात असेल तर यंत्रणांवर दबाव आहे. या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे. पण सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सीबीआय चौकश्या होत राहतील. रोहित पवार यांचे सर्व मुद्दे मी ऐकले.एक एफआयआर आहे ना फक्त. त्या एफआयआरला सरकार का घाबरतं? या त्यांच्या प्रश्नानं सरकारच्या भूमिकेवरच मोठा सवाल उपस्थित केला आहे.