Sanjay Raut : बेस्टच्या भूखंडावर कुणाचा डोळा? संजय राऊतांच्या आरोपांनी खळबळ, पतपेढी निवडणुकीत का झाला पराभव, आकड्यांनिशी सांगितलं
Sanjay Raut on BEST : खासदार संजय राऊतांनी आज भाजपसह बिल्डर लॉबीवर मोठे गंभीर आरोप केले. त्यांनी बेस्ट पतपेढीतील पराभवामागील कारण आकडेवारीनिशी समोर आणले. काय केला राऊतांनी तो गंभीर आरोप?

उद्धव सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. बेस्टच्या भूखंडावर भाजप प्रणीत बिल्डरांचा डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला. अख्खी मुंबई फडणवीसांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले. भविष्यात बेस्ट तोट्यात आणायची आणि ती बंद पाडायची असा मनसुबा आहे. बेस्टच्या जागेचा पुनर्विकास करायचा आहे. फडणवीस यांच्या लाडक्या बिल्डर, विकासकांच्या माध्यमातून बेस्टच्या डेपोंचा विकास करायचा आहे. प्रसाद लाड हे सुद्धा बिल्डरच आहेत. मुंबईतील बेस्टच्या सर्व डेपोमध्ये आपल्या लाडक्या बिल्डर्सना घुसवता यावं यासाठी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर त्यांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.
पतपेढीत पराभव कसा झाला?
बेस्ट कामगार पतपेढीत सेना आणि मनसे यांच्या पॅनलने एकत्रित निवडणूक लढवली. पण यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांना खातं ही उघडता आलं नाही. त्यावेळी दोन्ही पक्षांनी ही निवडणूक किरकोळ असल्याचे म्हटले होते. पण आता या पतपेढी निवडणुकीत पराभव कशामुळे झाला याचे विश्लेषण राऊतांनी केले. एक मत पाच पाच हजारांना भाजपने विकत घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. तर 1800 मतं अवैध ठरवण्यात आली. ही मतं कुणाला पडली हे पाहिले तर त्यातील बहुसंख्य मतं ही शिवसेनेच्या पॅनलला पडल्याचा दावा त्यांनी केला. 1 हजार मतं अपक्षांनी खाल्ली. ती सुद्धा भाजपनं उभी केल्याचा आरोप राऊतांनी केला. शिवसेनेचा पराभव करण्यासाठीच हा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मिस्टर फडणवीस शिवसेनेच्या नादाला लागू नका
बिल्डर लॉबी त्यामुळेच या पतपेढी निवडणुकीत उतरली. देवेंद्र फडणवीस यांना या सर्व गोष्टी पक्क्या ठाऊक आहेत. त्यांनी बेस्ट डेपोचं वाटप केलं आहे. कोणता डेपो कोणत्या बिल्डरला द्यायाचा हे ठरलेले आहे. त्यांना बेस्ट बंद पाडायची आहे. मिस्टर फडणवीस शिवसेनेच्या नादाला लागू नका. तुमची सर्व अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत, असा इशाराही राऊतांनी पत्रकार परिषदेत दिला. छोटे-मोठे बिल्डर घेऊन बिल्डर राज्य करीत आहेत. मुंबई अमराठी बिल्डरांना त्यांनी विकली आहे. त्यामुळेच तुम्हाला ठाकरे ब्रँड नको आहे.
या ब्रँडीच्या बाटल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक प्रमुख दैनिकांत पानभरून जाहिरात दिली, त्याचा राऊतांनी खरपूस समाचार घेतला. हे कसले ब्रँड. खरा ठाकरे ब्रँड असल्याचे ते म्हणाले. शिंदे, फडणवीस म्हणजे ब्रँडीच्या बाटल्या आहेत. त्याने नशा सुद्धा होत नाही. त्या विषाच्या बाटल्या असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोर्टावरही तोंडसूख घेतले. कोर्टानं शिंदेंवर कारवाईचे आदेश द्यायला हवेत असे ते म्हणाले. कोर्टाचे बोटचेपे धोरण असल्याचे इंगित करत त्यांनी कोर्ट सुद्धा त्यांचीच असल्याचा आरोप केला.
