बळीचा बकरा, विषारी इंजेक्शन अन्…; संतोष नलावडे यांनी मनसे का सोडली? 5 मोठी कारणं उघड
संतोष नलावडे यांनी २० वर्षांची साथ सोडून मनसेला जय महाराष्ट्र का केला? शिवडीतील अन्याय, वरिष्ठ नेत्यांची वागणूक आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा याबद्दल त्यांच्या पत्रातील सविस्तर कारणे वाचा.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचा प्रचार रंगत असताना दुसरीकडे दक्षिण मुंबईतील मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिवडीत पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. मनसेचे फायरब्रँड नेते बाळा नांदगावकर यांचे खंदे समर्थक आणि शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता संतोष नलावडे यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
संतोष नलावडे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात संतोष नलावडे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय का घेतला, याची प्रमुख कारणे सांगितले आहेत. यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या संतोष नलावडे यांनी पक्षाच्या बदलत्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एका भावनिक पत्राद्वारे आपली कैफियत मांडली आहे. ज्यामुळे मनसेच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम
संतोष नलावडे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची कार्यपद्धती आणि दुर्लक्ष यावर भाष्य केले आहे. राजसाहेबांच्या विचारांनी जो पक्ष उभा राहिला, तो आता पक्षातील काही नेत्यांच्या स्वार्थामुळे धोक्यात आला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून वापरा आणि फेकून द्या असे धोरण राबवले जात असल्याचा आरोप संतोष नलावडे यांनी केला आहे. राजसाहेबांनी त्यांच्या विचारांनी जो पक्ष फुलवला, आपल्यासारख्या निष्ठावंतांनी रक्त सांडून त्याचा वटवृक्ष केला. त्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो, पण आज अत्यंत वेदनेने सांगावे लागते की, तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते आपल्या स्वार्थासाठी छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. अशा विषारी झाडाला ना पाने येतात, ना फुले, ना फळे; तिथे पक्षीदेखील बसत नाहीत. जर आमचा आधारच छाटला जात असेल, तर आम्ही उभं राहायचं तरी कुठे? असा गंभीर आरोप संतोष नलावडे यांनी केला आहे.
आमचा राजकीय बळी दिला जातोय
शिवडी हा मनसेचा बालेकिल्ला असतानाही, आगामी निवडणुकीच्या जागावाटपात पक्षाने घेतलेल्या निर्णयावर नलावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग, भांडुप… हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मनसेचा कडवट, निर्णायक मताधार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जे अपयश आले, त्याचे खापर सर्वस्वी आमच्या माथी मारून आज आमचा राजकीय बळी दिला जात आहे. हे अयोग्य आहे. हे पाप आहे, असे संतोष नलावडे यांनी पत्रात म्हटले आहे.
दुसऱ्या महाराष्ट्र सैनिकांना का डावलले?
गेली २० वर्षे ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, केसेस घेतल्या आणि तुरुंगवास सोसला, त्यांना आज निवडणुकीच्या काळात वाऱ्यावर सोडले गेले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २०२, २०३, २०४ आणि २०६ मधील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली. त्यांची नाराजी केवळ स्वतःला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाही, तर त्यांच्या इतर सक्षम पदाधिकाऱ्यांचाही विचार केला गेला नाही, यावर देखील आहे. राग माझ्यावर असेल तर दुसऱ्या महाराष्ट्र सैनिकांना का डावलले? असा सवाल नलावडे यांनी उपस्थित केला आहे.
चक्रव्यूह भेदणारा योद्धा व्हायचे
ज्यांनी रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला, त्यांना आज दुसऱ्यांचे जोडे उचलण्यासाठी भाग पाडले जात आहे. जिथे नेत्यांच्या कचखाऊ, कुटील धोरणांमुळे कार्यकर्त्यांना ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी वागणूक मिळते, तिथे राहण्यात काय अर्थ? कुठे थांबायचे, हे ज्याला कळते तोच पुढे जातो. मला चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू व्हायचे नाही, तर तो चक्रव्यूह भेदणारा योद्धा व्हायचे आहे, असे सांगत संतोष नलावडे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
