AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजसाहेब खूप सोसले, खूप लढलो, आता रजा घेतो…; बाळा नांदगावकरांच्या विश्वासू शिलेदाराचे डोळ्यात पाणी आणणारे पत्र

राज ठाकरेंचे विश्वासू आणि बाळा नांदगावकरांचे समर्थक संतोष नलावडे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. "खूप सोसले, खूप लढलो, आता रजा घेतो" असे म्हणत त्यांनी मांडलेली व्यथा आणि राजीनामा पत्रातील सविस्तर मजकूर वाचा.

राजसाहेब खूप सोसले, खूप लढलो, आता रजा घेतो...; बाळा नांदगावकरांच्या विश्वासू शिलेदाराचे डोळ्यात पाणी आणणारे पत्र
| Edited By: | Updated on: Jan 09, 2026 | 9:55 AM
Share

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात ऐतिहासिक युती झाली असतानाच, मनसेला शिवडीमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे निष्ठावंत नेते आणि शिवडीचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे संतोष नलावडे शिंदे गटात सामील झाल्यामुळे मोठे आव्हाने उभे राहिले आहे. मनसेचे विधानसभा अध्यक्ष संतोष नलावडे यांनी पक्षाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत अत्यंत भावनिक पत्राद्वारे आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

संतोष नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहिले आहे. ज्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो, तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते स्वार्थासाठी छाटत आहेत. गेली २० वर्षे राजसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून, अंगावर केसेस झेलून आणि तडीपारी भोगूनही, आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला गेल्याचा आरोप या पत्राद्वारे संतोष नलावडे यांनी केला आहे.

संतोष नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना लिहिलेले पत्र जसंच्या तसं

॥ जय महाराष्ट्र ॥

प्रति, माझे जिवाभावाचे तमाम सहकारी, निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक, गट अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, विभाग आणि उपविभाग अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि शिवडीतील माझ्या प्रिय बांधवांनो-भगिनींनो,

आज हे पत्र लिहिताना मनात असंख्य वादळे घोंघावत आहेत. विचारांचे वादळ आले आहे. गेले अनेक दिवस मी अस्वस्थ आहे. ज्या भावनेने मी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा सदस्य झालो. पुढे झपाटून काम केले. त्याच पक्षाने माझ्यावर हे असं पत्र मला लिहायची वेळ आणली आहे. हे मलाच भयानक स्वप्नासारखे वाटते आहे. शाळेत असल्यापासून रक्तात सळसळणारा ‘शिवसैनिक’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राजसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेला हा तुमचा ‘भाऊ’, आज आयुष्याच्या एका अत्यंत कठीण वळणावर उभा आहे.

गेली २० वर्षे आपण संघटनेसाठी काय नाही केले? राजसाहेबांच्या एका शब्दावर आपण रस्त्यावर उतरलो. मराठी पाट्यांचे आंदोलन असो, टोलचा मुद्दा असो, रेल्वे भरती असो वा भोंग्यांविरोधातील एल्गार… आपण रक्ताचे पाणी केले, घाम गाळला. अंगावर केसेस घेतल्या, तडीपारी भोगली, तुरुंगवास सोसला. पक्षासाठी तन-मन-धन अर्पण केले.घरा-दारावर पाणी सोडले. हे सर्व कशासाठी? फक्त राजसाहेबांच्या एका स्वप्नासाठी की, “महाराष्ट्रातील कोणत्याही आई-बापाला अभिमान वाटेल की माझा मुलगा मनसेमध्ये आहे.” हे सन्माननिय राजसाहेबांचे वाक्य सत्यात उतरवण्यासाठीच. राजसाहेबांनी त्यांच्या विचारांनी जो पक्ष फुलवला, आपल्यासारख्या निष्ठावंतांनी रक्त सांडून त्याचा वटवृक्ष केला. त्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो, पण आज अत्यंत वेदनेने सांगावे लागते की, तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते आपल्या स्वार्थासाठी छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. अशा विषारी झाडाला ना पाने येतात, ना फुले, ना फळे; तिथे पक्षीदेखील बसत नाहीत. जर आमचा आधारच छाटला जात असेल, तर आम्ही उभं राहायचं तरी कुठे?

शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती झाली, दोन भाऊ एकत्र आले, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हीही त्याच विचारांचे पाईक आहोत. पण या युतीच्या जागावाटपात जे घडले, त्याला काय म्हणावे? माझ्या नेत्यांनी, ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्य पणाला लावले, त्यांनीच या जागावाटपात पूर्णपणे ‘हाराकीरी’ केली! हो, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय – ‘हाराकीरी’. ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या अस्तित्वावर केलेली जखम आहे.

शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग, भांडुप… हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मनसेचा कडवट, निर्णायक मताधार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जे अपयश आले, त्याचे खापर सर्वस्वी आमच्या माथी मारून आज आमचा राजकीय बळी दिला जात आहे. हे अयोग्य आहे. हे पाप आहे! शिवडी विधानसभा मतदारसंघाला आम्ही आई-वडिलांप्रमाणे मानले. तिथल्या मतदारांना जपले. पण आज आमच्या नेत्यांनी जागावाटपात घेतलेला हा निर्णय केवळ आमचाच नाही, तर मनसेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शिवडीकराचा विश्वासघात आहे.

फक्त मला एकट्यालाच उमेदवारी द्या असे माझे म्हणणे कधीच नव्हते. राग माझ्यावर असेल तर माझे दुसरे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक एकापेक्षा एक होते. त्यांनाही जनाधार आहे. मग त्यांच्यावर का अन्याय केलात ? मी गेल्या अनेक दिवसांपासून शिवडी विधानसभा अध्यक्ष म्हणून वरिष्ठांकडे आपली बाजू मांडत होतो. आपला हक्क मिळावा म्हणून दिवसा-रात्री प्राणापणाने लढलो. पण माझे सर्व प्रयत्न विफल झाले. आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्र सैनिकांच्या हक्काचा बळी दिला गेला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २०२, २०३, २०४ आणि २०६ या प्रभागांमधील महाराष्ट्र सैनिकांच्या पदरी केवळ उपेक्षाच आली आहे. त्यांचा ठरवून अवमान करण्यात आला आहे. आज त्यांच्यावर ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ असे हतबलपणे म्हणण्याची वेळ आणली गेली आहे. हे सारं आपण ज्यांना मान-सन्मान दिला त्या आपल्याच सन्माननिय नेत्यांनी केले आहे.

आमची काय अपेक्षा होती? आम्हाला पद, पैसा किंवा मोठा मान नको होता; फक्त राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवून म्हणावे, “तू लढ, मी तुझ्या मागे आहे!” पण दुर्दैवाने, ज्या कार्यकर्त्यांनी २० वर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आज त्यांनाच दुसऱ्यांचे जोडे उचलण्यासाठी वाऱ्यावर सोडले गेले आहे.

माझा राग आदरणीय राजसाहेब, अमित साहेब किंवा शर्मिला वहिनी यांच्यावर मुळीच नाही. त्यांनी आम्हाला नेहमीच प्रेम आणि आदर दिला. पण जिथे नेत्यांच्या कचखाऊ, कुटील धोरणांमुळे कार्यकर्त्यांना ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी वागणूक मिळते, तिथे राहण्यात काय अर्थ? कुठे थांबायचे, हे ज्याला कळते तोच पुढे जातो. मला चक्रव्यूहात अडकलेला ‘अभिमन्यू’ व्हायचे नाही, तर तो चक्रव्यूह भेदणारा योद्धा व्हायचे आहे.

तुम्ही स्वार्थापोटी आमचा वटवृक्ष छाटला असेल, पण लक्षात ठेवा, त्याच्याच फांद्या आम्ही पुन्हा ‘शिवडीच्या पवित्र भूमिमध्ये’ रोवून नवे वटवृक्ष फुलवून दाखवू! जिद्द काय असते आणि लढण्याची धमक काय असते, हे या महाराष्ट्र सैनिकाला सांगायची गरज नाही. ते बाळकडू आम्हाला आदरणीय राजसाहेबांकडूनच मिळाले आहे.

कदाचित काही जणांना माझा निर्णय चुकीचा वाटेल, अनेक लोक माझ्यावर आरोप करतील. पण मी किती निष्ठावंत आहोत. पक्षासाठी मी काय केलं ते माझे मलाच माहित आहे. माझ्यावर पुढे आरोप होतील. परंतू मी ना स्वार्थासाठी, ना पदासाठी, ना कुठल्या प्रलोभनांना भूललो. माझा राग, माझ्या भावना या फक्त माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहेत. तेही आज तोंड बंद करून मार सहन करत आहेत. अन्याया सहन करत आहेत. माझ्यासारख्या कडवट आणि निष्ठावंत सैनिकावर अशी दुर्दैवी वेळ येणे हे अनपेक्षित होते. परंतु माझ्यावर ही वेळ आपल्याच वरिष्ठांनी आणली. याचं दुख वाटते.

लक्षात ठेवा मी रडणारा नाही, तर लढणारा सैनिक आहे!

माझ्या शिवडीतील सहकाऱ्यांनो, मी तुमची माफी मागतो. तुमच्या हक्कासाठी मी प्राणापणाने लढलो, पण माझे प्रयत्न विफल झाले. म्हणूनच, आज जड अंतःकरणाने मी या प्रवासाला ‘पूर्णविराम’ देत आहे. आज मी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत असलो, तरी गेल्या २० वर्षांची ही संघर्षाची शिदोरी आणि राजसाहेबांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहतील. याची मला खात्री आहे.

खूप सोसले, खूप लढलो, आता रजा घेतो. पण पुन्हा सांगतो. आता रडायचं नाही, आता लढायचं. तुम्हीही माझ्या साथीने येणार याची मला खात्री आहे.

तुमचाच, संतोष नलावडे एक लढवय्या निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक

दरम्यान या पत्राचा समारोप करताना संतोष नलावडे यांनी आपण रडणारे नाही तर लढणारे सैनिक असल्याचे ठणकावून सांगितले आहे. राजसाहेब, अमित ठाकरे आणि शर्मिला वहिनी यांच्याबद्दल आदर कायम ठेवतानाच, त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या उपेक्षेबद्दल वरिष्ठांना जबाबदार धरले आहे. आज मी जड अंतःकरणाने या प्रवासाला पूर्णविराम देत असलो, तरी अन्यायाविरुद्धचा लढा थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

नाशिक दत्तक घेण्याच्या आश्वासनावरून राज ठाकरेंचा रोख नेमका कुणावर?
नाशिक दत्तक घेण्याच्या आश्वासनावरून राज ठाकरेंचा रोख नेमका कुणावर?.
इतका चुकीचा कॅरम फुटलाय की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भो$@- राज ठाकरे
इतका चुकीचा कॅरम फुटलाय की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भो$@- राज ठाकरे.
राज-उद्धव एकत्र येणे ही फक्त राजकीय घडामोड नाहीतर..राऊतांचा गौप्यस्फोट
राज-उद्धव एकत्र येणे ही फक्त राजकीय घडामोड नाहीतर..राऊतांचा गौप्यस्फोट.
मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचा प्रहार
मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचा प्रहार.
आमची शाह सेना मग तुमची सोनिया सेना..शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
आमची शाह सेना मग तुमची सोनिया सेना..शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.
भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी...जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी...जयंत पाटलांचा हल्लाबोल.
लाडक्या बहिणींसांठी CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज, भरसभेत मोठी घोषणा
लाडक्या बहिणींसांठी CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज, भरसभेत मोठी घोषणा.
पुण्यात भगवं वादळ, एकनाथ शिंदेंच्या 'रोड शो'ला प्रचंड गर्दी
पुण्यात भगवं वादळ, एकनाथ शिंदेंच्या 'रोड शो'ला प्रचंड गर्दी.
त्या ऑडिओ क्लीपने तापवलं ठाण्यातील राजकारण; माजी महापौर थेट म्हणाल्या.
त्या ऑडिओ क्लीपने तापवलं ठाण्यातील राजकारण; माजी महापौर थेट म्हणाल्या..
' मनसेत पुन्हा भूकंप? आणखी एक बडा नेता नाराज
' मनसेत पुन्हा भूकंप? आणखी एक बडा नेता नाराज.