पवार-फडणवीस दिल्लीत अमित शहांना भेटले?, फोटो व्हायरल; पण सत्य काय?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत हे दोन्ही नेते भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे.

पवार-फडणवीस दिल्लीत अमित शहांना भेटले?, फोटो व्हायरल; पण सत्य काय?
sharad pawar

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत हे दोन्ही नेते भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये ठाकरे सरकार पडणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीने पवारांचा दुसरा फोटो व्हायरल करून भाजपच्या आयटी सेलने अफवा पसरविल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे या फोटोच्या सत्यतेबाबतचं गुढ अधिकच वाढलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपचे नेते बीएल संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी चार तास चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. काल संसदेच्या संसदीय समिती आणि संरक्षण खात्याच्या समितीचीही बैठक होती. या बैठकीत भाग घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत आले होते. पवार आणि फडणवीस एकाच दिवशी दिल्लीत असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

राणेंनी बार उडवला

दरम्यान, नारायण राणे यांनी काल मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात मार्चपर्यंत भाजपचं सरकार येणार असल्याचं जाहीर केलं. राणेंनी सरकार स्थापण्याचा महिना सांगून टाकल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यानंतर अवघ्या काही तासातच पवार, शहा आणि फडणवीसांचा एकत्रित गप्पा मारतानाच फोटो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोने बघता बघता संपूर्ण सोशल मीडिया व्यापून टाकला. पवार-फडणवीस दोघेही शहांना एकत्रित भेटण्यामागचं कारण काय? पासून ते राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधाण आलं. शिवसेना आणि काँग्रेसला पवारांचा हा सूचक इशारा असल्याचंही सोशल मीडियातून बोललं जात होतं. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचा एकच धुरळा उडाला.

मॉर्फला माफी नाही

दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांचा ओरिजिनल फोटो व्हायरल करून आयटी सेल मार्फत कसा मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केला गेला याची पोलखोल केली. राष्ट्रवादीने ट्विट करून या फोटोमागचं सत्य सांगितलं. अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर विभाग असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

काय आहे फोटोत?

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या फोटोत शरद पवारांचा फोटो मॉर्फ करून लावण्यात आला आहे. मॉर्फ केलेल्या फोटोत शहा आणि पवार यांचे फोटो ब्लर दिसत आहेत. या फोटोत फडणवीस हिरव्या सोफ्यावर बसलेले आहेत. तर पवारही याच सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. मात्र, सोफ्याचा अर्धा रंग राखाडी दिसत आहे. पवारांच्या ओरिजिनल फोटोत ते राखाडी सोफ्यावर बसलेले दिसतात. तोच फोटो मॉर्फ करून फडणवीस-शहांच्या फोटोत चिपकवला आहे. मात्र, सोफ्याच्या रंगामुळे हा फोटो मॉर्फ केल्याचं स्पष्ट होत आहे.

तो फोटो कुणासोबतचा?

12 नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि इस्रायलचे महावाणिज्यदूत कोब्बी शोशानी यांची भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. या भेटीचा फोटो पवारांनी त्याच दिवशी ट्विट केला होता. तोच फोटो मॉर्फ करून शहांच्या फोटोत चिपकवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

नव्या व्हेरिएंटचा धोका, रुग्णालये आणि कोविड सेंटरचे फायर ऑडिट करा; एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

Omicron Variant: ओमिक्रॉन म्हणजे काय? कसा लागला या वेरिएंटचा शोध?

VIDEO: ज्या भेटीची राज्यात जोरदार चर्चा, त्याबाबत फडणवीस म्हणतात, भेट राजकीय नव्हतीच

Published On - 5:27 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI