Shiv Sena Operation Tiger: ऑपरेशन टायगर फसता फसता असे झाले फत्ते! 2 खासदार तयार नव्हते, मग शिंदेंनी वेळीच खेळली खेळी, काय ती इनसाईड स्टोरी?
Shiv Sena Operation Tiger: उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्ष फुटीचा सामना करावा लागला. 2022 मध्ये पक्ष आणि चिन्ह हातचे गेले. आता ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पाडण्यात आले. पण 2 खासदार यासाठी तयार नव्हते. पण त्या एका खेळीने 2 विकेट पडल्या.

Shiv Sena Operation Tiger: राज्यात उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे सेना यांच्यात पुन्हा धुसफूस वाढली आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यावेळी ठाकरे कुटुंबाकडून धनुष्यबाण निसटला. नवीन मशाल चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात चांगले यश आले. पण दोन वर्षे उलटत नाही तोच या आनंदावर पाणी फेरले. उद्धव ठाकरे यांचे 6 शिलेदार फुटले. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची गेल्या वर्षभरापासून चर्चा होती. अगदी गेल्या रविवारी खासदारांची ओळख परेड झाली. पण सहा जणांना बंडाळी केलीच. एका दाव्यानुसार, 2024 विधानसभा निवडणुकीनंतरच ऑपरेशन टायगर सुरू झालेहोते. जेव्हा परिसीमन विधेयकावरून लोकसभेत सरकारला पराभवाचा सामना करावा लागला, तेव्हाच या फोडाफोडीला हिरवा कंदिला मिळाला.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्याची तयारी सुरू झाली. महिला आरक्षण आणि मतदारसंघ परिसीमन विधेयकावर माघार घ्यावी लागल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला उद्धव सेनेचे खासदार सोबत आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संसदेत एनडीएची बाजू भक्कम होईल असे सांगण्यात आले.
अशी सुरू केली मोर्चेबांधणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने ऑपरेशन टायगरसाठी हिरवा कंदिल दाखवला. सर्वात अगोदर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना थेट मॅसेज देण्यात आला. त्यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळताच शिंदे सेनेने मोर्चेबांधणी सुरू केली.
पण केवळ चार खासदारांवर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नव्हते. कारण पक्षांतर कायद्याची अडचण होती. दोनतृतीयांश बहुमताचा जादुई आकडा गाठणे आवश्यक होते. त्यासाठी अजून दोन तगडे खासदार खेम्यात आणणे गरजेचे होते. शिंदे सेनेने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मुंबईतील संजय दिना पाटील यांना निरोप धाडला. निंबाळकर हे ठाकरेंच्या विश्वासातील होते. तर संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघाची मोठी अडचण होती. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदार आणि काही खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यावरही निंबाळकर ठाकरेंसोबत होते.या दोघांना फोडणे हे मोठे आव्हान होते.
शिदेंनी वेळीच खेळली चाल
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वडीलांची हत्या राजकीय वैरातून झाली हे जगजाहीर आहे. याविषयीच्या खटल्यात अंतिम निकाल यायचा आहे. खासदार संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार, निंबाळकर यांच्या खून खटल्यात ओमराजेंच्या बाजूने निकाल लावण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे ते पक्षाच्या बैठकीला हजर झाले नाही.
तर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील व्हाया काँग्रेस उद्धव सेनेसोबत आले होते. त्यांना पुन्हा पक्ष बदलण्याची इच्छा नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, निरोप आल्यानंतर संजय पाटील जाण्यासाठी इच्छुक नव्हते. पण त्यांची पत्नी पल्लवी यांचा अपघात झाला. पण त्यांना भेटायला उद्धव ठाकरे सेनेतून कोणीच गेले नाही. संजय पाटील यांची विचारपूस कोणी केली नाही. उलट एकनाथ शिंदे यांनी तातडीने दोघांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली. एक भावनिक आणि विश्वासाचं नातं तयार करण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. अशाप्रकारे दोन्ही नेते तयार झाले आणि ऑपरेशन टायगरमधील अडथळा दूर झाला. आता काही दिवसात फुटीर खासदारांचा हा गट शिंदे सेनेत जाण्याचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.
