तर तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसली नसती; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबईतील आझाद मैदानात गिरणी कामगारांनी हक्काच्या घरांसाठी भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चात हजारो कामगार सहभागी झाले आणि सरकारवर तीव्र टीका केली.

मुंबईतील आझाद मैदानात गिरणी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढला. मुंबईतच हक्काचे घर मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आज गिरणी कामगारांनी मोर्चा काढला. या मोर्चाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे पाठिंबा दिला. या मोर्चाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेतेही या मोर्चात उपस्थित आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघासह एकूण १४ कामगार संघटनांनी मिळून या मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक मागण्या करण्यात आल्या.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरजोरात भाषण केले. या भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं तर राज्यकर्त्यांना सांगतो तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसली नसती, अशा शब्दात घणाघात केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं तर…
“एक चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं शिष्टमंडळ आलं होतं. म्हणाले की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानात येतोय. शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे. म्हटलं शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरज नाही. शिवसेना तुमचीच आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. आणि सोबतच राहणार आहे. गिरणी कामगार त्यांचा इतिहास, गिरण्यांचा इतिहास हे उरावर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना माहीत नाही. त्यांना मुंबई लुटायची माहीत आहे. मुंबईसाठी रक्त सांडण्याचं माहीत नाही. गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं तर राज्यकर्त्यांना सांगतो तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसली नसती”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबईचा गळा घोटला की सगळं…
“त्यावेळीही मुंबईवर अधिकार सांगितला जात होता. पण मराठी माणूस, गिरणी कामगार तर आघाडीवर होता. सर्व रस्त्यावर उतरले. तेव्हाच्या केंद्र सरकारला गुडघ्यावर आणलं आणि आपली मुंबई आपण राखली. त्याच मुंबईत दिल्लीतील मालकाचे नोकर मुंबईकरांना बाहेर काढायला असूसलेला आहे. त्यांना मुंबई हवी. का तर त्यांना माहीत आहे. त्यांच्या लेखी मुंबईला मुंबादेवीच्या नावावरून मुंबई म्हणतो. पण हे दोन व्यापारी तिकडे बसले आहेत. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं. म्हणूनच मराठी माणसात आग लावायची, मराठी अमराठी भेद करून भेदाभेद करून आपल्यात फूट पाडण्याचा डाव आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
