शिवसैनिक सुसाट, ED ऑफिसवर BJP चे बोर्ड लावले

संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना 'ईडी हा भाजपचा पोपट' असल्याचा घणाघात केला

शिवसैनिक सुसाट, ED ऑफिसवर BJP चे बोर्ड लावले

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले. संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात केला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना आता आणखी रंगतदार होणार आहे. (Shivsena workers put BJP banner on ED Office)

संजय राऊत काय म्हणाले?

“आपण सगळे कालपासून, खासकरुन मीडिया एक प्रश्न विचारत आहे. ईडीच्या नोटीसचं काय झालं? आपण मला घरी भेटलात, ‘सामना’त भेटलात, शिवसेना कार्यालयात भेटलात, मी नेहमी तुमच्याशी बोलत असतो. आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी किंवा इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना देशात प्रतिष्ठा होती. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटलं, तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात.” असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता.

“राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी”

“गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक… माझ्या नावाचा तुम्ही कालपासून गजर करत आहात. जे प्रमुख नेते आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, जे राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाहीत, त्यांना अशा नोटीस पाठवल्या जातात. याला फ्रस्टेशन, हतबलता म्हणतात.. राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी.. छत्रपतींची भूमी आहे, समोरासमोर लढा” असं आवाहनही राऊतांनी केलं.

“फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं”

“घरातील महिला, कुटुंबावर हल्ले करणारे नामर्द आहेत. अशी नामर्दगी करणारे जे कोणी असेल तर गप्प बसणार नाही. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आम्ही त्यांना तसंच त्या स्तरावर जाऊन उत्तर देऊ. आम्ही घाबरत नाही. कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊ द्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं” असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती, कागदपत्र हवी आहेत. ती कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पुरवली. पण गेल्या तीन महिन्यात त्यांनी काहीही शंका व्यक्त केली नाही. भाजपची माकडं कालपासून उड्या मारत आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावला. माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला.

“बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम”

तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे, असं भाजप नेते म्हणत आहेत. शिवसेनेच्या 22 लोकांच्या नावांची यादी दाखवली गेली, त्या लोकांना ईडीच्या नोटिसा जारी करत त्यांच्यावर दबाव आणणं, हे तंत्र अवलंबलं जात आहे, असा दावा राऊतांनी केला. सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते मला धमकावत आहेत, आम्हाला अटक करा, पण सरकार पडणार नाही. बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. (Shivsena workers put BJP banner on ED Office)

हे दहा वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. माझ्या पत्नीने घरासाठी कर्ज काढलेले आहे. कोणत्या पक्षाला किती देणग्या दिल्या, ही माहिती आहे. 20 कोटींचा हिशेब माझ्याकडे आहे. भाजपची माकडं उड्या मारत आहेत. आमच्या कुटुंबाची संपत्ती, एक वर्षात 1600 पटीने वाढलेली नाही. भाजप नेत्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1600 पटींनी वाढली, त्यांची संपत्ती चौकशी ईडीने केलीय का? ती आधी करा, असंही राऊत यांनी फर्मावलं.

“आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे”

कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, आम्ही लॉ मेकर आहोत, मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, तुमची संपत्तीचे आकडे माझ्याकडे, तुमच्या मुलांचे हिशेब माझ्याकडे, मात्र उद्धव साहेबांचा आदेश, बाळासाहेबांची शिकवण, कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, लढाई समोरासमोर करायची. ईडीच्या नोटीचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो, असा टोलाही राऊतांनी लगावला.

संबंधित बातम्या :

ईडीचा धाक दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव; राऊतांचा मोठा आरोप

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

(Shivsena workers put BJP banner on ED Office)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI