
Parth Pawar on Rajya Sabha: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादांचे भीषण विमान अपघातात बुधवारी निधन झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. तशीच पोकळी सत्तेतही जाणवू लागली. पण जबाबदार्या टाळता येत नाहीत. सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त होईल. त्या जागी पार्थ पवार यांचं नाव पुढे येत आहे. तर भाजपचं केंद्रीय नेतृत्व पार्थ पवार यांच्या नावाबाबत सकारात्मक असल्याची माहितीही समोर येत आहे.
राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी
राष्ट्रवादीत कालपासून वेगवान घाडमोडी घडत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वातास राष्ट्रवादीचे हेवीवट नेते वर्षा बंगल्यावर होते. मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उपमुख्यमंत्री पदासाठीचा प्रस्ताव दिला. तर राष्ट्रवादीची खाती याच पक्षाकडे ठेवण्याची मागणी केली. सुनेत्रा पवार आज मंत्रिमंडळात सहभागी होतील. त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त होईल. त्या जागेवर पार्थ पवार यांचे नाव समोर आले आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचे निश्चित झाले आहे.
सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी आज निवड होईल. संध्याकाळी त्यांचा शपथविधी होईल. राजभवनात त्या संध्याकाळी 5 वाजता शपथ घेतील. त्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवतील. अजितदादांच्या अकाली निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. लवकरच निवडणूक आयोग पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण?
आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोण असणार ही पण चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर येत असलं तरी राष्ट्रवादीतील एक मोठा वर्ग सुनेत्रा पवार यांनाच हे पद द्यावे अशी आग्रही मागणी करत आहे. पवार कुटुंबाकडेच पक्षाची सूत्रं असावीत अशी आग्रही मागणी आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची कमान असेल हे स्पष्ट होत आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयीची चर्चाही लवकरच होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत याविषयीच्या चर्चाही पुढे जात असल्याचे समजते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी मजबूत करावी आणि संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र असावे अशी मागणी दोन्ही बाजूने होत आहे. शरद पवार यांची भूमिका यासाठी महत्त्वाची असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी दोन्ही पक्षातील आमदार-खासदारांची भूमिका आहे.