Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लाडक्या बहिणींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरलेल्या महिलांचा सन्मान म्हणून काही ठिकाणी स्थानिक भाजप नेते मोफत साड्या वाटप करतायत. मात्र या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा सन्मान होतोय की अपमान, असा प्रश्न महिलाच विचारु लागल्या आहेत.
लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप नेते आता ठिकठिकाणी महिलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम घेवू लागले आहेत. मात्र शून्य नियोजन मोफत वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांहून जास्त आलेली गर्दी. त्यात काही खराब निघालेल्या साड्यांचा आरोप आणि कार्यक्रमात अनेक महिलांवरच उपाशी राहण्याची वेळ आल्यानं हे कार्यक्रम टीकेचे धनी बनले आहेत.
नांदेडच्या हदगावातल्या जगापूरमधली ही दृश्यं आहेत. इथं भाजपकडून विधानसभेला इच्छूक असलेल्या कैलास राठोडांनी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला. मात्र महिलांच्या गर्दीमुळे इथं चेंगराचेंगरी होता-होता राहिली. कशी-बशी वाट काढून महिला गेटबाहेर पडत होत्या आणि गेटबाहेर उभे असलेले भाजपचे कैलास राठोड महिलांच्या हाती साडीची पिशवी थांबवत होते. हाल झालेल्या महिलांनी आयोजकांना शिव्या-शाप दिले. तर दुसरीकडे भाजपचे कैलास राठोड मात्र लाडक्या बहिणींना सन्मानासाठी हा कार्यक्रम केल्याचा दावा करत होते.
साड्या खराब निघाल्याच्या आरोपात अनेकांनी साड्यावाटप करणाऱ्या लोकांच्या अंगावरच त्या फेकून दिल्या. कार्यक्रमात महिलांचा आहे हे माहित असूनही गर्दी हाताळण्यासाठी महिला पोलिस दिसत नव्हत्या. ३ दिवसांपूर्वी नांदेडच्याच हदगावातल्या तामसा गावात असाच प्रकार घडला. साड्या कमी आणि महिला जास्त असल्यामुळे एकमेकांच्या हातून साड्या खेचण्याची स्पर्धाच रंगली. भाजपचे विधानसभा मंडळ प्रभारी भागवत देवसरकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. देवसरकर सुद्धा तिकीटासाठी इच्छूक असल्यामुळे तीनच दिवसात दुसरे इच्छूक कैलास राठोडांनी सुद्धा त्यांच्याच धर्तीवर मोफत साडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याची चर्चा आहे.
एकीकडे सरकारमधले तिन्ही प्रमुख नेते लाडक्या बहिण योजनेच्या कार्यक्रम ठिकठिकाणी घेतायत. सरकारच्या वतीनं जाहिरातीद्वारे लाडक्या बहिण योजनेचा प्रचारही सुरुय आणि तिसरीकडे ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्यासाठी विधानसभेला इच्छूक उमेदवार मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम राबवतायत पण नियोजनावरुन हे कार्यक्रम वादात सापडतायत.