अखेर युतीवर शिक्कामोर्तब, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युतीची घोषणा; आघाडीत ‘वंचित’ चौथा भिडू

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 1:22 PM

अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.

अखेर युतीवर शिक्कामोर्तब, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युतीची घोषणा; आघाडीत 'वंचित' चौथा भिडू

मुंबई: अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत चौथा भिडू मिळाला आहे. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत.

यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केलं. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

देश प्रथम म्हणून एकत्र आलो

आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

वैचारिक प्रदूषण संपवायचंय

एक भ्रम पसरवला जातो. हुकूमशाहीकडे अशीच वाटचाल होत असते. जनतेला भ्रमात ठेवायचं, नको त्या वादात अडकवायचं आणि आपलं इप्सित साध्य करायचं हे सुरू आहे. याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. संविधानाचं पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून एकत्र आलो

तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललं आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितलं. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

संभाव्य संकट रोखण्यासाठी…

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे.

त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

आंबेडकरांची ऑफर

प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा प्रस्तावही त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. आंबेडकर यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये युतीची चर्चाही झाली. त्यानंतर जागा वाटप आणि किमान समान कार्यक्रमावर या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा

जयंतीचं औचित्य साधलं

गेल्या महिन्याभरापासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या युतीसाठीच्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर अखेर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीचे औचित्य साधून या युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी ठाकरे गट आणि वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI