Uddhav Thackeray: बंगालमध्ये वाघीण एकटीच लढतेय…उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणाने भाजपला झिणझिण्या, महिला आरक्षणावरून काढले वाभाडे
Uddhav Thackeray Over BJP: महिला आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे तुटून पडले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. या संशोधन, दुरुस्ती बिलाआडून लोकसभेच्या जागा वाढवण्याचा भाजपचा डाव विरोधकांनी उलथवून टाकल्याचा आरोप त्यांनी केला.

Uddhav Thackeray Over Mamata Banerjee: महिला आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे तुटून पडले. नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाआडून देश तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता आणि तो विरोधी पक्षांनी उधळवून लावल्याचा दावा केला. त्यांनी डिलिमिटेशनवरून भाजपला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सर्व मलाच पाहिजे या हव्यासाची वखवख सुटल्याचा टोला पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला. पक्ष निष्ठा काय असते हे त्यांनी दत्ता साळवी यांचं उदाहरण देऊन सांगितलं. तर त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी एकटीच लढत आहे. त्यांनी निवडणूक जिंकलीच पाहिजे असे मोठे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा रोख भाजपकडे होता. भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर आणि सरकारच्या धोरणावर जाहीर टीका केली.
नोकरीची राजीनामा देऊन दत्ता साळवी शिवसेनेत
दत्ताजी यांचं नाव मी मुद्दाम घेतो ते घ्यायलाच पाहिजे यात काहीही वाद नाही. १९ जुन १९६६ साली शिवसेनेची सुरुवात झाली. आम्ही तेंव्हा दादरला रहायचो. दत्ता साळवी तेंव्हा बाळासाहेबांना भेटायला आले होते आणि नोकरीचा राजीनामा देऊन बाळासाहेबांच भाषण ऐकून आले होते. नोकरी सोडून तुम्ही इकडे कशाला आला आहात असे बाळासाहेबनी त्यांना विचारल होत. पण दत्ता साळवी यांनी नोकरी सोडून हजारो कामगारांच्या आयुष्यात उजेड आणला. शिवसेनाप्रमुखांची हीच शिकवण आहे धाडस महत्वाचं. सोडून जाताय जा पण गेल्यानंतर जे गेलेत त्यांचे अनुभव ऐका की बाबा तुझी काय अवस्था आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ५८ वर्षात कामगार सेनेच्या एकही कामगाराची आपण फसवणूक केलेली नाहीये करणार नाही.
आता वेगवेगळी दुकान उघडली जातायत. ५८ वर्षे शिवसेना या क्षेत्रात काम करते आहे. या क्षेत्रात एवढा वेळ नेतृत्व करणे म्हणजे येड्यागबाळ्याच काम नाही. युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तिकडे मग जावं लागत नाहीतर घरी बसाव लागत. सगळ्याच कंपन्या, उद्योग आणि हॉटेलमध्येही आपल्या युनियन आहेत. प्रत्येक गेटवर असणाऱ्या भगव्याशी माझ नात आहे कुठल्याही मालकाशी नाही एवढा मी प्रखर आहे, असे ठाकरे म्हणाले.
दुबईमध्ये अनेक उत्तर भारतीय तिकडे काम करतायत. त्यांना हल्ल्यादरम्यान सरकारने सांगितलं की परत या परत या.
तिथल्या कामगारांनी सांगितल आम्ही परत येऊन बेकारीने मरण्यापेक्षा इथे काम करता करता मरु. आजवर जे जे लढे झाले त्या सगळ्या लढ्यांमध्ये कामगार उतरला नसता तर स्वातंत्र्यही उशीरा मिळाल असत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढही सुरू झाला नसता असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बंगालमध्ये वाघीण एकटीच लढतेय
कुणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? विरोधी पक्षाचे बुरखे पडणार असे आपले सीएम म्हणतात अरे आम्ही हिंदू आहोत मग आम्हाला बुरखे का घालताय? असा टोला ठाकरे यांनी लगावला. तिकडं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ही वाघीण एकटीच लढतेय. जिंकल्याच पाहिजे त्या. त्या एका महिलेला हरवण्यासाठी जवळपास दोन लाख सीआरपीएफचे जवान तिकडे तैनात करण्यात आले आहे. जेव्हा मणिपूर जळत होतं, तेव्हा 30 हजार जवान होते. पण पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत तेव्हा तिकडे दोन काय पाच लाखाच्या घरात जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदान करणार कसं, कोण करणार? तुमची हिंमत आहे मतदान करण्याची? जर ममता बॅनर्जी हरल्या तर तिथं जिंकण्याचे क्रेडिट हे घेतील. ही लोकशाही आहे? योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री बंगालमध्ये. या राज्यात मात्र ड्रग्जचे रॅकेट सुरू आहे. भोंदूगिरी सुरू आहे. महिलांचे शोषण सुरू आहे. पण आम्हाला त्याचे काही नाही. महाराष्ट्र जिंकला, मग बंगाल जिंकायचा, मग आसाम, मग इतर राज्य हेच सुरू आहे. कामगारांनी मोर्चा काढल्यावर हे पाकिस्तानचं कारस्थान असल्याचा आरोप करण्यात येतो. नोएडात हेच घडलं. म्हणजे आता न्यायहक्कासाठी कामगाराने रस्त्यावर उतरू नये का असा सवाल ठाकरेंनी केला.