बाळासाहेब इंग्रजी माध्यमात शिकलेत त्यांच्यावर शंका घ्याल का? राज ठाकरेंचा सवाल
महाराष्ट्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी लादण्याच्या निर्णयाच्या मागे घेण्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांचा संयुक्त विजयी मेळावा पार पडला. २० वर्षांनंतर एकत्र आलेले हे बंधू राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण करतील असे मानले जात आहे.

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजयी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल २० वर्षांच्या राजकीय अंतरावर हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी मानली जात आहे. यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आलेल्या राज ठाकरे यांनी भाषेच्या राजकारणावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. माघार घेतली ना काय करायचं तर वेगळ्या ठिकाणी वळवा प्रकरण. ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. मग पुढे. दादा भुसे मराठीत शिकले मंत्री झाले. फडणवीस मराठीत शिकले मंत्री झाले. याचा काय संबंध,. कुणाचे मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल. असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात, असे राज ठाकरे म्हणाले.
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली
आम्ही मराठी माध्यमात शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का. लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्यावर. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे? असा सवालही राज ठाकरेंनी केला.
बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले
दाक्षिणात्य कलाकार इंग्रजी माध्यमात शिकले. एआर रहमान परवा व्यासपीठावर उभे होते. बाई तामिळ बोलत होती. अचानक हिंदी बोलायला लागली. एआर रहमानने बघितलं हिंदी? आणि ते खाली उतरले. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले. इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढलं. त्यांनी भाषेशी तडजोड केली नाही. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. कोणती भाषा. काय वाकडं झालं. आपल्या सैन्यात मराठा, शीख, जाट, पंजाब, पॅराशूट, गडवाल रायफल, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू काश्मीर, गोरखा रायफल आहे. लडाख स्काऊट, सिक्कीम स्काऊ आहे. इथल्या राज्याच्या रेजिमेंट आहे. शत्रू दिसल्यावर तूटून पडतात ना. मग भाषेचा प्रश्न येतो कूठे. भाषावार प्रांत रचना त्याच कारणासाठी होती ना. या गोष्टी का सुरू केल्या. आता सांगून ठेवतो. आज मराठी म्हणून एकत्र आला. महाराष्ट्रातील तमाम मराठी एकत्र आला आहे. याचं पुन्हा राजकारण तुम्हाला जातीत विभागतील. जातीचं कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीत विभागायला सुरू करतील, अशीही सूचना राज ठाकरेंनी यावेळी दिली.