पनवेलमध्ये लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

पनवेलमध्ये लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

पनवेलच्या कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी रोडच्या कडेला एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी (16 डिसेंबर) आढळून आला. एका गोणीमध्ये भरुन या मुलाता मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता.

Nupur Chilkulwar

|

Dec 16, 2019 | 8:04 PM

नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी पनवेलमधल्या गाढी नदीजवळ एका 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा मृतदेह सापडला होता (Panvel Dead Body Found). या व्यक्तीची गळा आवळून हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं. ही घटना ताजी असतानाच पनवेलमध्ये पुन्हा एकदा एक मृतदेह आढळून आला आहे (Unknown Boy Dead Body Found). हा मृतदेह एका लहान मुलाचा आहे. पनवेलमध्ये अशा प्रकारे मृतदेह आढळून येत असल्याने सध्या पनवेलकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पनवेलच्या कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी रोडच्या कडेला एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी (16 डिसेंबर) आढळून आला. एका गोणीमध्ये भरुन या मुलाता मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता. प्राथमिक अंदाजानुसार, मृत मुलगा हा आठ-नऊ वर्षांचा असून त्याच्या अंगात ग्रीन टी शर्ट आणि हाफ काळी पॅन्ट घातलेली आहे. अशाप्रकारे गोणीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पनवेल शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून हत्येचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जेएनपीटी रोडच्या बाजूला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एक प्लास्टिक गोणी बेवारसरित्या पडल्याचं परिसरातील नागरिकांना आढळलं. या गोणीमध्ये एका लहान मुलाचा मृतदेह असल्याचं पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांनी पनवेल शहर पोलिसांना कळवलं. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. हा खुनाचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, मृतदेहाची ओळख पटावी यासाठी त्याचे छायाचित्र आणि वर्णन सर्वत्र पाठवण्यात आले आहे. याशिवाय, कुठला लहान मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे का? याचीही माहिती परिसरातील पोलीस ठाण्यातून मागवण्यात आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें