Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! या 11 वॉर्डमधील पाणी पुरवठा 30 तासांसाठी बंद राहणार
Water Cut in Mumbai: मुंबई महानगरपालिकेने पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे 11 वॉर्डमधील पाणी पुरवठा 30 तासांसाठी बंद राहणार आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहराच्या काही भागातील लोकांना सोमवारी आणि मंगळवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे तब्बल 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अमर महल भूमिगत बोगद्याच्या संबंधित महत्त्वाचे काम केले जाणार आहे, त्यामुळे हा पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे बीएमसीने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
30 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर (पूर्व) येथील छेडानगर जंक्शन परिसरामधील 3000 मिमी मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडण्याचे काम केले जाणार आहे. हे काम 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन मंगळवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत केले जाणार आहे. यामुळे शहरातील काही भागात 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर कमी दाबाबने पाणी पुरवठा होणार आहे.
कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार?
पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनच्या कामामुळे दक्षिण आणि मध्य मुंबईतील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर वॉर्ड तसेच पूर्व उपनगरांतील एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस आणि एन वॉर्ड या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याचाच अर्थ भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा, डोंगरी, मस्जिद बंदर, वरळी, परळ, सायन, वडाळा आणि शिवडी या भागातील पाणी पुरवठा 30 तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, चूनाभट्टी, गोवंडी, देवनार, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप या भागातील काही परिसारातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, किंवा कमी दाबावे पाणीपुरवठा होणार आहे.
पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे पालिकेचे आवाहन
पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘पाईपलाइनचे नवे कनेक्शन शहराच्या दीर्घकालीन जलपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी अत्यावश्यक असल्याने हे काम पुढे ढकलणे शक्य नाही,” असे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी संबंधित वॉर्डनिहाय प्रसिद्धपत्रक तपासावे आणि दोन दिवस चालणाऱ्या देखभाल कामासाठी योग्य तयारी करावी, असंही बीएमसीकडून सांगण्यात आले आहे.
