Rain Update : पावसाला धाडले आवतान; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तीन दिवसांत धो धो बरसणार
Heavy Rain Update : अवकाळी, पूर्व मौसमी असे रंग दाखवून पाऊस रेंगाळला खरा, त्याने एक दहा दिवसांची सुट्टी सुद्धा टाकली. पण तो आता पुन्हा कामावर रूजू होत आहे. पावसाला सर्वांनीच आवताण धाडले आहे. लवकरच तो राज्यात सक्रिय होईल.

राज्यात लवकर भेटीला आलेल्या पावसाचे मनसुबे काही केल्या कोणालाच कळले नाही. हवामान खात्याला तर त्याने चांगलाच चुकांडा दिला. त्याच्या लपंडावामुळे बळीराजाचे आवसान गळाले. तर चाकरमान्यांची आणि गृहिणींची काळजी वाढली. आता ऐन पावसाळ्यात पाणी कपातीचे संकट उभे ठाकते की काय असा काळजीचा सूर उमटला. पण पावसाला सर्वांनीच आवताण धाडल्याने तो दीर्घ रजेवरून तात्काळ कामावर रूजू होण्यास सज्ज झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
14 जून पासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय
12 जूनपासून पावसाचे वेध सुरू होतील. तर 14 जून पासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे समोर येत आहे. राज्यात मुंबईसह आसपासच्या भागात थांबलेला मान्सून 14 जून पासून सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान 17 जून पर्यंत राज्यात वादळी वारे मेघगर्जनेसह विजांच्या कडगडाटासह कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्यमहाराष्ट्र मराठवाडा,विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
देशात पूरसदृश स्थिती
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हवामान खात्याचा हवाला देत त्यांनी जून महिन्यात 108 टक्के पाऊसमान असण्याचा अंदाज वर्तवला आहे. काही अंदाज वर्तवणाऱ्या मॉड्युल्सनुसार, पुढील तीन आठवड्यात पावसाचा कहर दिसेल. राज्यात धो धो पाऊस पडेल. रान आबादानी होईल. सगळीकडे नदी-नाले एक होतील. काल राज्यातील अनेक शहरात वादळी वारे आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान झाले. अनेक झाडं उन्मळून पडली.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यात येत्या चार ते पाच दिवसांसाठी कोकण, विदर्भात धो धो पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. अकोल, अमरावती,नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातरा, कोल्हापूर या जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसेल. शनिवारी कोकण आणि तळ कोकणात पावसाची जोरदार हजेरी असेल. तर रविवारी कोकणात पाऊस शिमगा करण्याची चिन्हं आहेत.
