पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एलिवेटेड डेकची सुविधा, काय आहे योजना ?
मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास अधिक चांगला होण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एकत्र येत ही योजना आखली आहे.

मुंबईचे गर्दीचे उपनगरीय रेल्वे स्थानक म्हणून दादर स्थानक ओळखले जाते. या दादर स्थानकात पश्चिम रेल्वे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सहकार्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एलिवेटेड डेक उभारणार आहे. या एलिवेटेड डेकचे काम विविध टप्प्यात होणार असून त्यामुळे प्रवाशांची गर्दीचे विभाजन होऊन अधिक मोकळी जागा मिळणार आहे. या एलिवेटेड डेकला विविध पादचारी पुलांनी तसेच सरकते जिने आणि लिफ्टने जोडले जाणार आहे. तर पाहूयात नेमकी काय योजना आहे.
पहिला टप्पा –
पहिल्या टप्प्यात दादर स्थानकाच्या फलाट क्र.१, २ आणि ३ च्यावर आणि उत्तर दिशेच्या सध्याच्या दोन पादचारी पुलांना जोडणारा एक १०० मीटर बाय ३३ मीटरचा एक एलिवेटेड डेक उभारण्यात येणार आहे. या फेजमध्ये चार जिने, ४ सरकते जिने आणि २ लिफ्टची सुविधा असणार आहे.
४ जिने
४ सरकते जिने
२ लिफ्ट
दुसरा टप्पा
फेज १ चे बांधकाम झाले की फेज २ चे काम सुरु होणार आहे. त्यानंतर फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर साधारण १०० मीटर बाय १५ मीटरचा अतिरिक्त एलिवेटेड डेक उभारण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात २ जिने, २ सरकते जिने आणि १ लिफ्टचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.
२ जिने
२ सरकते जिने
१ लिफ्ट
दोन्ही फेजचे काम पूर्ण झाल्यानंतर एलिवेटेड डेक दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील चार पादचारी पुलांना जोडला जाणार आहे. त्यामुळे फलाटावर गर्दीचे विभाजन होऊन त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांनी नीट वावरता येणार आहे.
दादर रेल्वे स्थानकातील दररोजच्या प्रवाशांची गर्दी पाहताना लोकल गाड्यांचे वेळापत्रक फारसे विस्कळीत न करता या एलिवेटेड डेकचे काम करण्यास खूपच कमी मार्जिन वेळ मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा पाहता हे काम करणे जिकरीचे ठरणार आहे.
दादर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन उपनगरीय मार्ग एकत्र येत असल्याने येथे मोठी गर्दी रोज उसळत असते. पश्चिम रेल्वेने ही गर्दी पाहता या एलिवेटेड डेकचे काम दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा हा एलिवेटेड डेक बांधला गेला तर प्रवाशांची ये-जा आणि तिकीट काढण्यासाठीची सुविधा अधिक सुटसुटीत आणि कमी गर्दीची होणार आहे.
