Nagpur MLC Election Result 2026 : शिंदे शिवसेनेपाठोपाठ फडणवीसांसाठी आली गुड न्यूज, भाजपसाठी भरपूर प्रतिष्ठेचा विषय, कारण 42 वर्षानंतर काँग्रेसला..
Nagpur MLC Election Result 2026 : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु आहे. 23 ऑक्टोंबरला महाराष्ट्र विधान परिषेदच्या पाच जागांसाठी निवडणूक पार पडलेली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यासाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला पहिली गुड न्यूज मिळाली. अमरावती शिक्षक मतदारसंघातून एकनाथ शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर आहेत. त्यानंतर आता भाजपसाठी गुड न्यूज आहे. नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. नागपूरमधील पदवीधरची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण मुख्यमंत्री स्वत: नागपूरचे आहेत. नागपूर पदवीधर मतदार संघात एकूण 38 उमेदवार रिंगणात उभे आहेत. मुख्य लढत भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात आहे.
मागच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. अभिजित वंजारी इथून निवडून आलेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढत आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा पराभव केला होता. काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना 61701 मतं मिळाली होती तर संदीप जोशी यांना 42791 मतं मिळाली होती. 18919 मतांनी वंजारी यांचा विजय झाला होता. येथे साल 1978 नंतर पहिल्यांदाच वर्ष 2020 मध्ये इथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 42 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसने ही जागा जिंकली होती.
पसंतीच्या मतांचा कोटा म्हणजे काय?
अभिजित वंजारी हे महाविकास आघाडीचे तर सुधाकर कोहळे हे महायुतीचे उमेदवार आहेत. पसंतीक्रम आधारित मतदान पद्धतीत (preferential voting system), उमेदवाराला विजयी होण्यासाठी वैध मतांचा एक निश्चित कोटा (quota) पूर्ण करावा लागतो. जर पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कोणत्याही आघाडीच्या उमेदवाराला हा कोटा गाठता आला नाही, तर पुढील फेऱ्यांमधील मतमोजणी आणि पसंतीक्रमांचे हस्तांतरण ( transfer of preferences) निकालाची दिशा ठरवू शकते.
पदवीधरची निवडणूक सरकारसाठी महत्वाची का आहे?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यासाठी महत्वाची असते कारण समाजातला एक विचारी वर्ग काय विचार करतोय, सध्याच्या सरकारी धोरणांवर त्यांची भूमिका काय याचा एक कल दिसून येतो. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे.
