नागपूर मनपा निवडणुकीत भाजप बहुतांश उमेदवार बदलणार, पॅटर्नही ठरला, नगरसेवकांची धाकधूक वाढली!

महानगरपालिका निवडणूक सहा महिन्यांवर आलीय. या निवडणुकीत भाजप 25 ते 30 टक्के उमेदवार बदलणार आहे. त्यामुळे नागपूरमधील भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप बहुतांश उमेदवार बदलणार, पॅटर्नही ठरला, नगरसेवकांची धाकधूक वाढली!
नागपूर महापालिका

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक सहा महिन्यांवर आलीय. या निवडणुकीत भाजप 25 ते 30 टक्के उमेदवार बदलणार आहे. त्यामुळे नागपूरमधील भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. तिकीट कट होणाऱ्या उमेदवारांमध्ये आपला नंबर लागू नये, अशी इच्छा सगळेच भाजप नगरसेवक मनोमन व्यक्त करत आहेत.

समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना नारळ

समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना भाजप वगळणार आहे. तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत करताना, नागपूर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी तीन च्या प्रभाग पद्धतीचं स्वागत केलंय तसंच त्यांनी पक्षाच्या निर्णयाची माहिती दिलीय.

बदल करावे लागतात

प्रत्येक निवडणुकीत 10 ते 20 टक्के उमेदवारांचं तिकीट बदललं जातं. त्यात नवीन काही नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर मग नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असेल तर निश्चित काही बदल करावे लागतात. कुणी नाराज होण्याचा प्रश्न नसतो, असंही त्यांनी सांगितलं.

ज्या नगरसेवकांची मागील 5 वर्षात समाधानकारक कामगिरी नसेल अशा 25 ते 30 टक्के नगरसेवकांना भाजप वगळणार आहे, असं भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितलंय. त्यामुळे नागपुरातील भाजपच्या नगरसेवकांची धाकधूक वाढलीय.

भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचे तत्कालीन महापौर आणि उमेदवार संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर भाजप सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तरुणांचे मेळावे आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनं एक प्रकारे मिशन नागपूर महापालिका सुरु केलेय.

50 हजार तरुणांची फळी तयार करणार

भाजपच्या वतीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे सुरु करण्यात आले आहेत. भाजप नागपूर जिल्ह्यात 50 हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार आहे. एका बुथवर 25 तरुणांची फळी काम करेल. त्यादृष्टीनं भाजपची तयारी सुरु असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण सदस्य: 151

भाजप :108

काँग्रेस: 29

बसपा : 10

इतर :04

2011 च्या लोकसंख्येनुसार नवीन वॉर्ड रचना

नागपूर महापालिकेची सध्याची सदस्य संख्या 151 आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार वार्ड रचना होणार असल्यानं नागपूर महानगरपालिकेत 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यास इच्छूक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार नवीन वॉर्ड रचना करण्यास मंजुरी मिळाल्यास नव्या प्रभाग रचनेत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या 151 नगरसेवक आहेत, ती संख्या 166 होण्याची शक्यता आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

(BJP will change 25 to 30 percent candidates in Nagpur Municipal Corporation elections)

हे ही वाचा :

नागपुरातील राजकारण्यांना अच्छे दिन, नव्या प्रभारचनेमुळे 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता

प्रदेश महासचिवांची हकालपट्टी करा, नागपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर, गटबाजी उफाळली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI