Nagpur Hotel Fire: नागपूरमध्ये हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
Nagpur Hotel Fire: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील प्रसिद्ध अनंततारा हॉटेलला भीषण आग लागली. हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले

Nagpur Hotel Fire: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील प्रसिद्ध अनंततारा हॉटेलला भीषण आग लागली. गुरुवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मनोज बांडे असं मृत व्यक्तीचा नाव आहे. तर तीन जण जखमी झाले.
आगीची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोलार एक्सप्लोसिव्हचा पाण्याचा टँकर आणि कोंढाळी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी तपासानंतरच कारण स्पष्ट होणार आहे राष्ट्रीय महामार्गालगतच्या प्रसिद्ध हॉटेलला लागलेल्या आगीचे कारण आणि नुकसानीचा तपशील तपासातून समोर येणार आहे.
हिंगोलीत पाच दुकानांना मोठी आग
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे जुने बस स्थानक परिसरात टिन पत्र्याच्या दुकानांना आग लागली. आगीत चार ते पाच दुकानातील साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
विक्रोळीत रॉकेटमुळे आग
रॉकेट पडून इमारतीच्या खाली बांधलेल्या संरक्षण जाळीला आग लागली. तरुणांच्या प्रसंगवधानाने आगीची मोठी दुर्घटना टळली. विक्रोळी कन्नमवार नगर येथील घटना, तथास्तू गृहनिर्माण सोसायटीतल्या तरुणांनी प्रसंगावधान दाखवले. दिवाळी उडवले जाणारे रॉकेट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सरक्षण जाळीवर येऊन पडल्याने आगीने पेट घेतला होता. पण तरुणांनी तत्काळ पाऊल उचलत स्वत प्रसंगवधान दाखवत फायर सिस्टीमच्या माध्यमातून आग विझवली.
ठाणे पोलिसांची कारवाई
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात किम्स हॉस्पिटलजवळ गंभीर आजारी रुग्ण आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे हॉस्पिटलच्या दिशेने रॉकेट फटाके फोडल्याप्रकरणी भूपेंद्र सिंग आणि शिवम शर्मा या दोघांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई केली.
