LPG CNG | नागपुरात घरांमध्ये पाईपलाईनने मिळणार सीएनजी; किती दिवस वाट पाहावी लागणार?

सीएनजी सुरक्षित, स्वस्त आणि एलपीजीपेक्षा अधिक पर्यावरण फ्रेंडली आहे. सीएनजीचा उष्मांक मूल्य एलपीजीपेक्षा अधिक आहे. वाहनांना सीएनजीमध्ये रूपांतर करता येते. त्यामुळं आर्थिक बचतही होते.

LPG CNG | नागपुरात घरांमध्ये पाईपलाईनने मिळणार सीएनजी; किती दिवस वाट पाहावी लागणार?
प्रातिनिधीक फोटो

नागपूर : पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस बोर्डाने (पीएनजीआरबी) विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाईपलाईनद्वारे सीएनजी पोहचविण्याची व्यवस्था करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. वित्तीय निविदा पंधरा फेब्रुवारीपर्यंत काढण्यात येणार आहेत. कंत्राटदाराला जिल्ह्यात नेटवर्क पूर्ण करण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे. काही भागात तीन-चार वर्षांत कंपनी सीएनजीचा पुरवठा सुरू करू शकेल. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची (गेल) सीएनजी पाईपलाईन बुटीबोरीपर्यंत पोहचली आहे. त्याचा शहर आणि जिल्ह्यात विस्तार करण्यात येणार आहे.

सहा टप्प्यांत होणार काम

सीएनजी नेटवर्कसाठी विदर्भाला सहा भौगोलिक क्षेत्रात विभागले आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा विदर्भात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याचे काम पूर्ण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात भंडारा, गोंदिया व गडचिरोली, तर तिसऱ्या टप्प्यात चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात काम पूर्ण केले जाईल. चौथ्या टप्प्यात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात तर पाचव्या टप्प्यात अकोला, हिंगोली व वाशिममध्ये काम केले जाईल. सहाव्या म्हणजे अंतिम टप्प्यात बुलडाणा, नांदेड व परभणीचा समावेश राहील. गेल्या वर्षी सीएनजी पुरवठ्यासाठी बोर्डाने निविदेच्या अकरा फेऱ्या घेतल्या होत्या. पाईपलाईनने पुरवठा सुरू झाल्यास सीएनजीच्या किमतीत घट होणार आहे.

शहरात सध्या दोन सेंटर सुरू

सध्या शहरात रोमॅट कंपनीचे ऑटोमोबाईलकरिता दोन सीएनजी सेंटर सुरू आहेत. पाईपलाईनने जाळे विणले गेल्यास शंभर ते दीडशे स्टेशन सुरू होतील. काही कंपन्या सीएनजी पुरवठा करण्याच्या निविदे प्रक्रियेत आहेत. त्यामध्ये गेल, इंडियन ऑईल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, महानगर गॅस, गुजरात गॅस, अदानी गॅस या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळं एलपीजी सिलिंडरसाठी प्रतीक्षा करण्याचे दिवस आता संपत आले आहेत. चार-पाच वर्षांत विदर्भात घरगुती, व्यावसायिक प्रतिष्ठान आणि उद्योगांमध्ये क्राम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) पोहचेल.

Nagpur ZP | ग्रामीण भागात शाळा आहे पण शिक्षक नाही!; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय सोय केली?

Vaccination | नागपुरात आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस; आणखी कुणाकुणाचा समावेश?

Nagpur leopards | बिबट्या आला रे..! सहा जनावरे केली फस्त; कन्हान शेतशिवारात दहशत

Published On - 6:11 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI