कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला, थेट केंद्रीय मंत्र्याची… काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना पक्षाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. युवक झुरळ नाहीत, असे म्हणत हे नाव अयोग्य असल्याचे आठवले म्हणाले. दीपके यांनी रिपब्लिकन पक्षात येण्याची त्यांची ऑफर यापूर्वी नाकारली होती. आठवलेंनी दीपकेच्या आंदोलनाचे समर्थन केले असले तरी, समस्यांवर उपाय सुचवण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली होती. दीपके यांनी आठवलेंची ही ऑफर फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता आठवले यांनी दीपकेंना दुसरा सल्ला दिला आहे. दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदललं पाहिजे. तरुण हे काही झुरळ नसतात, असं आठवले यांनी म्हटलं आहे. आठवले यांच्या या मागणीवर दीपके काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रामदास आठवले हे यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षात अनेक गट आहेत. मला दीपकेंचा पाठिंबा मिळाला तर महाराष्ट्रात आमचा पक्ष वाढवू शकतो. तो तरुण आहे. सक्रीय आहे. कॉकरोच जनता पार्टी चालवत असल्याचं सांगून त्याने आमची ऑफर नाकारली आहे. पण मला वाटतं कॉकरोच जनता पार्टीत राहून काही अर्थ नाही. दीपकेंनी आपल्या पक्षाचं नाव बदललं पाहिजे. कॉकरोच हे काही नवजवान नाहीत. झुरळ इकडे तिकडे फिरत असतात, असं सांगतानाच अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुसरा पक्ष न काढता रिपाइंत यावे, असं मी म्हटलं होतं. पण ते येत नसतील तर जबरदस्ती नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
प्रश्न सुटणार नाही, उपाय सूचवा
कॉकरोच जनता पार्टीचा अजेंडा वेगळा आहे हे मला माहीत आहे. अभिजीत दीपके हा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय तरुण आहे. त्याने कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करून पेपर लिक प्रकरणाचं आंदोलन योग्यवेळी सुरू केलं. अशा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्याने अमेरिकेत पक्षाची स्थापना केली. भारतात आल्यावर आंदोलन केलं. सगळ्यांना जागृत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याने पेपर लिकचा प्रश्न सुटणार नाही. राजीनामा दिल्याने प्रश्न मार्गी लागणार नाही. आता दीपके आणि त्यांच्या टीमने यावर उपाय सूचवले पाहिजे, असं आठवले म्हणाले.
फंड आला असं वाटत नाही
आठवले यांनी दीपकेंच्या शाळांबाबतच्या मागण्यांचंही समर्थन केलं. दीपकेंची शाळांबाबतची मागणी योग्य आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच कॉकरोच जनता पार्टीच्या फंडिंगवरही त्यांनी भाष्य केलं. हा विषय खूप संवेदनशील आहे. बाहेरचा फंड आला असेल या मताचा मी नाहीये. आम्ही सुद्धा आंदोलने केली आहेत, असंही त्यांनी म्हटलं.
लाठीचार्ज व्हावा हीच इच्छा
जंतरमंतरवरील आंदोलनात लाठीचार्ज व्हावा अशीच कॉकरोजच्या नेत्यांची इच्छा होती. त्याशिवाय मागण्या पूर्ण होणार नाही, असं त्यांना वाटत होते. पण शांततेतही आंदोलन करता येतं, असं सांगतानाच लाठ्यांना खिळे लावणं योग्य नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांवरील केसेस मागे घेण्याची आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संघाचे कार्यकर्ते नव्हते
जंतरमंतरवरील आंदोलनात संघाचे कार्यकर्ते नव्हते, असं सांगतानाच मी लाठीचार्जचं समर्थन करत नाही. मारहाण झाली हे बरोबर नाही. आम्ही जर नीट बाबत आधीच निर्णय घेतला असता तर मोर्चा झाला नसता, असंही त्यांनी सांगितलं.
