अशोक चव्हाण यांचा वर्गमित्र मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत; नांदेडमध्ये घडामोडींना वेग
D P Sawant May Be Leave Congress : नांदेडच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. अशोक चव्हाण यांचे वर्गमित्र डी. पी. सावंत हे लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे नांदेडच्या राजकीय वातावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण राज्यसभेचे सदस्य झाले. आता नांदेडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशोक चव्हाण यांचे वर्गमित्र, माजी मंत्री डी. पी. सावंत महिन्याभरात राजकीय निर्णय घेणार आहेत. काँग्रेस सोडून डी. पी. सावंत लवकरच अशोक चव्हाण यांची साथ देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. डी. पी. सावंत हे याआधी राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आता डी. पी. सावंत काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं आहे.
डी. पी. सावंत काँग्रेस सोडणार?
अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये अनेकांनी काँग्रेस सोडली. मात्र त्यांचे वर्गमित्र आणि निकटवर्ती समजले जाणारे काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी सावंत हे देखील लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. तब्येतीच्या कारणामुळे तीन महिने राजकीय जीवनापासून दूर होते. आता महिनाभरात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजकीय निर्णय घेणार आहेत. काँग्रेस सोडून ते अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाणार की, काँग्रेसमध्ये राहूनच नांदेड उत्तर विधानसभा लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
डी. पी. सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
डी. पी सावंत यांनी याबाबत टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. माझ्या तब्येतीमुळे मागची तीन महिने मी कुठेच गेलो नाही. मी अजून तरी काँग्रेस सोडलेली नाही. अशोकराव चव्हाणसाहेब माझे मित्र आहेत. कॉलेज पासून मित्र आहेत, मैत्रीत राहणारच आहे. माझा नांदेड उत्तर मतदारसंघ होता. तिथे युतीचे आमदार आहेत. त्यामुळे युतीत आता तिकीट बदलण्याची शक्यता नाही. त्यामुळे काय करावं याबाबत मी विचार केलेला नाही. एका महिन्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, असं डी. पी सावंत यांनी म्हटलं आहे.
मी अजून काही निर्णय घेतला नाही एका महिन्यात काहीतरी राजकीय निर्णय घ्यावा लागेल. विधानसभा लढवायची असेल तर युतीतून लढवायची की आघाडीतून याचा विचार करावा लागेल. युतीमध्ये काही स्कोप नाही, असं आज दिसत आहे. कार्यकर्त्यांचा फारच आग्रह झाला. तर सगळ्यांशी संवाद साधून विचार करू. अशोकराव चव्हाण भाजपात गेले. तेव्हा असं वाटलं होतं, वन प्लस वन अकरा होतील. पण वन प्लस वन दोन्ही होऊ शकलं नाही. लोकांना अपेक्षा आहे की मी लढावं, कार्यकर्ते अनेक सांगतात की तुम्ही काहीतरी भूमिका घ्या, कार्यकर्त्याची इच्छा आहे की मी परत यावं. मी चर्चा करून एका महिन्याभरात निर्णय घेणार आहे, असंही डी. पी. सावंत म्हणाले.
