लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देण्यावरुन महायुतीमधील मंत्र्याचा ‘यू टर्न’, ‘2100 रुपये देऊ,’ असे म्हटलेच नाही…
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेले नाही. यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील देणार नाहीत, असा दावा करत होते. मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयांवर जास्त जोर धरला आहे. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे.

राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिणींची 1500 रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार? त्याची वाट पाहत आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 1500 रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खूश आहेत. 2100 रुपये देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जळगावात माध्यमांसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेले नाही. यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील देणार नाहीत, असा दावा करत होते. मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयांवर जास्त जोर धरला आहे. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत.
नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्याबाबत नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी आमची इच्छा आहे. अजित दादा यावर निर्णय घेतील. मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देण्याबाबत त्यांचे चांगले धोरण आहे. दोन नंबरचा व्यवसाय केला तर टायरमध्ये गेलाच म्हणून समजा, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर झिरवळ म्हणाले, दोन नंबरचा व्यवसाय केल्याने इतरांवर परिणाम होतो. त्यामुळे कदाचित यासंदर्भात अजित पवार बोलले असतील. यासंदर्भात मी ऐकले नाही, मात्र चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या बातम्या सुरू आहेत. याबद्दल आम्हाला बातम्यांमधून माहिती मिळते आहे, असे त्यांनी सांगितले.
२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, आणखी किती वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावे, हे जनता ठरवेल. जनताच जनार्दन आहे. चांगले काम करत राहिल्यास निश्चितच त्यांचा आशीर्वाद मिळतो. नितेश राणे यांनी व्यवहार करताना हिंदू आहे का? असे विचारुन त्यांच्यासोबत व्यवहार करावा असे वक्तव्य केले होते. त्यावर झिरवळ यांनी कोणी काय बोलावे हा ज्यांचा त्यांचा विषय आहे. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असे सांगितले.
