भाजपच्या फडणवीसांचा नाशिक शिवसेनेचे चुंभळे यांनी भरगच्च कार्यक्रमात केला सत्कार; चर्चांना उधाण
शिवाजी चुंभळे हे सध्या शिवसेनेत असून, नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. ते नाशिक बाजार समितीचे सभापतीही होते. मात्र, त्यांची ही कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली. त्यांना 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.

नाशिकः नाशिक (Nashik) दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शिवसेनेचे (Shiv Sena) वादग्रस्त नेते शिवाजी चुंभळे यांनी भरगच्च कार्यक्रमात भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे राज्यात शिवसेना भाजपमध्ये जोरदार वाद सुरू असताना नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी झालेल्या कार्यक्रमास्थळीच भरगच्च स्टेजवर जात फडणवीस यांचा सत्कार चुंभळे यांनी केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने ही नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहेत शिवाजी चुंभळे?
शिवाजी चुंभळे हे सध्या शिवसेनेत असून, नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. ते नाशिक बाजार समितीचे सभापतीही होते. मात्र, त्यांची ही कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली. त्यांना 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा रुजू करून घेण्यासाठी चुंबळे यांनी 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. पण तडजोडीअंती 6 लाखांवर सौदा झाला. हे पैसे स्वीकारताना चुंबळेंना बेड्या ठोकल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आला. त्या काळात त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळांवर आरोप केले होते. त्यामुळे राजकीय सूत्र फिरली. आणि ते एकटे पडले.
खरेच सूत जुळणार का?
शिवसेनेच्या उपनेतेपदी कालच सुनील बागुल यांची निवड करून शिवसेनेने एक महत्त्वाची खेळी खेळलीय. बागुल हे नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या उपमहापौर भिकुबाई बागुल यांचे पुत्र आहेत. तर बागुल त्यांचे चिरंजीव शंभू बागुल, हे सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत. हे सारे पाहता माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यानंतर हे महत्त्वाचे पद शिवसेनेने बागुल यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे. आता या तोडफोडीच्या राजकारण वादग्रस्त आणि एकटे पडलेल्या शिवसेनेच्या चुंभळेंना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप जवळ करणार का, हे काळच सांगेल.
इतर बातम्याः
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात
