अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; येवल्यातल्या शेतकऱ्यांची मागणी

गेल्या आठवड्यामध्ये येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाने मोठा धुमाकूळ घातला. यामुळे मका, कांदा, भुईमूग, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; येवल्यातल्या शेतकऱ्यांची मागणी
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.


नाशिकः गेल्या आठवड्यामध्ये येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाने मोठा धुमाकूळ घातला. यामुळे मका, कांदा, भुईमूग, सोयाबीनसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मका पीक घेतले. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. मका पिकात गुडघ्या इतके पाणी साचले. पीकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे याची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. येवल्यातल्या विजय जेजुरकर यांनी मका लागवड केली होती, तर रामनाथ देशमुख यांनी तीन एकरवर कांद्याची लागवड केली होती. त्याला जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. मात्र, अतिवृष्टीमुळे कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणी साचले. पीक पूर्णपणे खराब झाले असून शासनाने सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. दरम्यान, तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करण्याकरीता तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांचे पथक नेमले आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून सदर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. शासनाकडून आलेली मदत तात्काळ स्वरूपात शेतकऱ्यांना दिली जाईल, असे आश्वासन येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिले आहे.

54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल

जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नाशिककडे पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये विनाशक हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच आहेत, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे.

कांद्याचे पीक आडवे

नांदगाव-मालेगावमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने कांद्याची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत. आता प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.

बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखरा जातो. इथे बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस पडला आहे. 12 तासांमध्ये 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे.  सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा एकदा वार केला आहे.

इतर बातम्याः

कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा

नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI