Lalit Patil : पाया पडून एवढीच विनंती की… ड्रग्स माफिया ललित पाटील याच्या आईचा गौप्यस्फोट काय?
ड्रग्स माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्याला कोर्टात सादर करणार आहेत. त्यापूर्वी पोलीस पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर अधिक भाष्य करणार आहेत. त्यापूर्वीच ललित पाटील याच्या आईने मोठा दावा केला आहे.
चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 18 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. तब्बल 15 दिवस पोलिसांना गुंगारा देत ललित फिरत होता. अखेर त्याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 10 पथकेही तयार केली होती. आता त्याच्या अटकेने ड्रग्स प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ललित पाटील चौकशीत काय माहिती देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ललितचा एन्काऊंटर करू नका, एवढीच विनंती करते, असं आवाहन पोलिसांना केलं आहे.
ललित पाटीलच्या आईने टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक माहितीही दिली आहे. पोलिसांनी ललितला अटक केली आहे. आता पोलीस जो निर्णय घेईल. तोच योग्य. ललितने असा काय मोठा गुन्हा केलाय? त्याच्या एन्काऊंटरची गरज काय? जे लोक मोठमोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा. आमचं मत आहे की, त्याचं एन्काऊंटर करू नये. त्याच्या मागे दोन मुलं आहेत. आई वडील आहेत, असं ललितच्या आईने सांगितलं.
पोलीस दोनदा आले
ललितचा एन्काऊंटर होण्याची आम्हाला भीती वाटते. पोलिसांना एवढीच विनंती आहे की, त्याचा एन्काऊंटर करू नका. पोलीस दोनदा आमच्या घरी आले. त्यांनी तपासणी केली. पहिल्यावेळी भूषणला घेऊन गेले होते. नंतर पुन्हा भूषणला घेऊन आले आणि घराची तपासणी केली. तेव्हाही भीती वाटत होती. त्याचा एन्काऊंटर करतात की काय? अशी भीती वाटत होती. पोलीस आम्हाला तसं बोलूनही गेले होते. तो सापडला तर एन्काऊंटर करू असं पोलीस म्हणाले. नेते लोकही तेच म्हणत आहेत. असं करू नका. एवढीच पाया पडून विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.
त्याला फसवलं गेलंय
ललितने त्याला फसवलंय हे सांगावं. जी शिक्षा मिळेल ती भोगावी. पण त्याला फसवलं गेलंय. तोही घाबरला असेल. मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय. त्याने पोलिसांना सहकार्य करावं. मला फसवलं गेलंय. त्यामुळे मी या मार्गाला लागलो. पैशासाठी टॉर्चर केलं जात होतं. त्यामुळे मी पलायन केलं, हे त्यानं सांगावं, असं त्याच्या आईने म्हटलंय.
म्हणून तो पळाला
त्याच्या एन्काऊंटरची भाषा करणं हे चुकीचं आहे. राजकारणीही तेच म्हणत आहेत. पोलीसही तेच म्हणत होते. त्याने असा काय गुन्हा केला? त्याचं हार्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला नेलं असताना डॉक्टर म्हणाले, तुझ्यावर आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुरुंगात नेलं तर तू जगू शकणार नाही. त्यामुळे तो घाबरून तिथून पळाला, असा दावाही त्यांनी केला.