गणपतराव उभे राहायचे तेव्हा मुख्यमंत्रीही खाली बसायचे, एवढा त्यांना मान होता; भुजबळांनी जागवल्या आठवणी

गणपतराव देशमुखांनी केलेली कामं हीच त्यांची श्रीमंती असल्याने त्यांनी केलेली ही विकासाची कामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील अशा शोकभावना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

गणपतराव उभे राहायचे तेव्हा मुख्यमंत्रीही खाली बसायचे, एवढा त्यांना मान होता; भुजबळांनी जागवल्या आठवणी

नाशिक : गणपतराव देशमुख यांनी लोकांसाठी आयुष्यभर आपला देह झिजवला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठवला. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी केलेलं काम हीच त्यांची श्रीमंती असल्याने त्यांनी केलेली ही विकासाचीकामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील अशा शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. नाशिकच्या गंगापूर रोड येथील मुरकुटे हॉल येथे आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. (Ganapatrao Deshmukh’s work was his wealth : Chhagan Bhujbal)

यावेळी आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी महापौर दशरथ पाटील, अॅड. भगीरथ शिंदे, अॅड. जयंत जायभावे, अॅड. नितीन ठाकरे, डॉ. डी. एल. कराड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शरद आहेर, सावनाचे जयप्रकाश जातेगावकर, कॉ. राजू देसले, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे, यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळावेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एक पक्ष, एक व्यक्ती, एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांमुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली. त्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विक्रम रचला होता. दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम देखील मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला होता.

गणपतराव उभे राहायचे तेव्हा मुख्यमंत्रीही खाली बसायचे

भुजबळ म्हणाले की, गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते. 11 वेळा आमदार राहूनही त्यांचं राहणीमान अत्यंत साधं राहिलं. सभागृहात मुख्यमंत्री उभे राहिल्या नंतर कोणीही मध्ये उभे राहून न बोलण्याची प्रथा आहे. मात्र मुख्यमंत्री बोलत असतांना जर कधी गणपतराव देशमुख उभे राहिले तर मुख्यमंत्री सुद्धा खाली बसत इतका मोठा मान त्यांना सभागृहात होता.

सांगोल्याचा कायापालट केला

रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे गणपतरावांचे अथक प्रयत्न, चिकाटीने काम करण्याची जिद्द होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.

अभ्यासू संसदपटू

‘विधानसभेचे विद्यापीठ’ अशी त्यांची ओळख होती. विधेयकांच्या चर्चेत सहभागी होऊन अभ्यासू संसदपटूची ओळख निर्माण करत सभागृहात त्यांनी आदर्श निर्माण केला होता. थोर राजकारणी, राज्याचा चौफेर अभ्यास असणारे चालते बोलते विद्यापीठ, लोकशाहीच्या इतिहासाने दखल घेतलेले लोकप्रतिनिधी, पुरोगामित्वाचा आवाज बुलंद करणारे, सभागृहातील पेचप्रसंगाची कोंडी फोडणारे, आयुष्याला चळवळ समजून जगणारे, नव्वदीतही तरुणाला लाजविणारे अभ्यासपूर्ण नेतृत्व करत सभागृहाला स्तब्ध करणारे एकमेव आमदार होते. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं, अशा शोकभावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

इतर बातम्या

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

राज ठाकरे म्हणतात, राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद फोफावला; प्रविण दरेकरांनी दोनच शब्दात दिलं उत्तर

उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींना काय सांगितलं?; राऊतांनी केला गौप्यस्फोट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI