भूमाफिया रम्मीला पोलीस कोठडी, 20 जणांवर खुनाचा गुन्हा; राजकीय दबाव झुगारून केलेली कारवाई चर्चेत

बहुचर्चित आनंदवली खून प्रकरणातील मास्टरमाइंड भूमाफिया रम्मी राजपूत आणि त्याचा भाऊ जिम्मी राजपूतची आज पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्यासह 20 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूमाफिया रम्मीला पोलीस कोठडी, 20 जणांवर खुनाचा गुन्हा; राजकीय दबाव झुगारून केलेली कारवाई चर्चेत
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः बहुचर्चित आनंदवली खून प्रकरणातील मास्टरमाइंड भूमाफिया रम्मी राजपूत आणि त्याचा भाऊ जिम्मी राजपूतची आज पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्यासह 20 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी रम्मी राजपूतसह बिल्डर बाळासाहेब कोल्हे, सचिन त्र्यंबक मंडिलकसह वीस जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राजकीय दबाव झुगारून केलेली ही कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिकमधल्या आनंदवलीमध्ये वृद्ध शेतकरी रमेश मंडलिक यांचा खून फेब्रुवारी महिन्यात झाला होता. भूमाफियांनी सुपारी देऊन हे कृत्य केल्याचा संशय होता. या प्रकरणात पोलिसांनी संशयित नितेश सिंग याला ताब्यात झारखंडमधून ताब्यात घेतले होते. एकूण 20 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, मुख्य आरोपी रम्मी राजपूत पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावली होती. मात्र, तो सतत पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. पोलिसांना तो उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पसार झाल्याचे समजले. त्यांनी त्याचा तपास सुरू केला. तेव्हा रम्मीचा भाऊ जिम्मी उत्तराखंडमध्ये एका हॉटेलात लपल्याचे कळाले. त्याला उचलले असता, रम्मी राजपूत हिमालचलमध्ये पसार झाल्याचा सुगावा लागला. त्यानुसार पथकाने त्याला हिमाचल प्रदेशातून उचलले. रम्मी राजपूत सतत ठिकाणे बदलत होता. चंदीगढ, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गोवा अशा ठिकाणी त्याचा वावर सुरू होता. मात्र, पोलिस त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात आला. विशेष म्हणजे या वीस जणांच्या टोळीवर मोक्का लावू नये, अशी याचिका बिल्डर बाळासाहेब कोल्हे याने उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

30 लाख आणि 10 गुंठे जमिनीची सुपारी

रमेश मंडलिक यांचा खून करण्यासाठी आरोपींनी त्यांची 30 लाख रुपये आणि 10 गुंठे जमिनीची सुपारी होमगार्ड गणेश काळे आणि आबासाहेब भडांगे यांचा भाचा भगवान चांगले याला दिली होती. रमेश मंडलिक हे पाच फेब्रुवारी रोजी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. याप्रकरणी रमेश मंडलिक यांचा मुलगा विशाल मंडलिक यांनी फिर्याद दाखल केली होती.

अनेक गुन्हे उघडकीस येणार

आरोपींमध्ये सचिन मंडलिक, अक्षय जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दत्तात्रय काशीनाथ मंडलिक, नितीन पोपट खैरे, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळू चांगले, बाळासाहे बारकू कोल्हे, गणेश भाऊसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, अनिल वराडे, जगदीश त्र्यंबक मंडलिक, रम्मी परमजितसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी आदींचा समावेश आहे. या भूमाफिया टोळीसोबत इतर अनेकांचे संबंध उघडकीस आले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

अपघातग्रस्तांना पालक मंत्री भुजबळांनी दिला मदतीचा हात; वणीहून परतताना वाहतूकही केली सुरळीत

Special report अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI