‘देवा तूच सांग’, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मुख्यमंत्र्यांना डिवचले?, त्या बॅनरची नाशिकमध्ये तुफान चर्चा
Deva Tuch Sang : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'देवाभाऊ' या कॅम्पेनला 'देवाभाऊ तूच सांग' असं प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. काय आहे हे बॅनर वॉर?

NCP on Devendra Fadnavis : शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या ‘देवाभाऊ तूच सांग’ या बॅनरने आणि अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील जाहिरातीने राज्यात चर्चेला पेव फुटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ‘देवाभाऊ’ असं कॅम्पेन राबवण्यात आलं होते. त्याला हे राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर असल्याचे म्हटलं जात आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज एकदिवसीय शिबिर होत आहे. नुकताच शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रंगीत तालीम
महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे लवकरच वाहणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने कंबर कसली आहे. त्यासाठी नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिराला महत्त्व आले आहे. या शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील. या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद, हितगूज साधण्याचा आणि पक्षात नवचैतन्य आणण्याचा, कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीची रणनीती पण आखली जाईल. हे शिबिर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे म्हटलं जात आहे.
‘देवा तूच सांग’ ची चर्चा
नाशिकमध्ये आयोजित शिबिरापूर्वीच देवा तूच सांग या बॅनर आणि जाहिरातीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. प्रमुख दैनिकांच्या पहिल्या पानावरील या जाहिरातीने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. या जाहिरातीत शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टीचे संकट, नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव, इतर योजना, महिला सुरक्षा आणि बेरोजगारी अशा प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. तर उद्या नाशिकमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
गुलाबीला पिवळ्याचे आकर्षण
अजितदादांनी विधानसभा निवडणुकीत गुलाबी रंगाचे कॅम्पेन राबवले. गुलाबी जॅकेटची तेव्हा मोठी चर्चा झाली. या कॅम्पेनचा फायदा झाल्याचे बोलले जाते. तर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने जाहिरातीत पिवळ्या रंगाची उधळण केली आहे. ओबीसी समाजाच्या मोर्चातही पिवळ्या रंगाचे फेटे, रुमाल दिसले. काही दिवसांपूर्वी नागपूर येथून ओबीसी पदयात्रेचा पक्षाने हुंकार भरला होता. त्यानंतर आता ओबीसींना जवळ करण्यासाठी हा प्रयोग तर केल्या जात नाही ना? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
